कोपरगावात झेडपीच्या शाळेत भरली भाकरी बनविण्याची स्पर्धा
कोपरगावात झेडपीच्या शाळेत भरली भाकरी बनविण्याची स्पर्धा
कोपरगावात झेडपीच्या शाळेत भरली भाकरी बनविण्याची स्पर्धा
कोपरगाव विजय कापसे दि ९ मार्च २०२४–शाळकरी मुलांमध्ये स्त्री पुरुष समानता,तसेच मुलांना आईच्या कष्टाची जाणीव व्हावी, घरातलं प्रत्येक काम करता यावं या उद्देशाने कोपरगाव शहरामधील जिल्हा परिषद कोपरगाव ब्रांच शाळेतील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाकरी थापण्याची आगळीवेगळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
यासाठी लागणारे साहित्य पीठ, चूल, तवा सर्व मुलांना घरून आणण्यास सांगितले होते. हे साहित्य शोधताना विद्यार्थ्यांच्या शोधक वृत्तीलाही चालना मिळाली. या अनोख्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे आईच्या गोल भाकरीची आठवण व तिला पडत असलेल्या कष्टाची जाणीव झाल्याची भावना या वेळी सहभागी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवली.
या अनोख्या स्पर्धेत सुमारे 50 विद्यार्थी सहभागी झाले होते. या 50 विद्यार्थ्यांमध्ये सर्वात चांगली भाकर बनवण्याची ही स्पर्धा रंगली होती. भाकरी थापत असताना विद्यार्थ्यांना चूल पेटवताना मोठी कसरत यावेळी करावी लागली. नुकताच अवकाळी पाऊस पडल्यामुळे ओल्या काड्या पेटवताना मुलांना मोठी दमछाक करावी लागली. धूर डोळ्यात गेल्याने अनेकांनी आजी आणि आईच्या आठवणी सांगत एक दुसऱ्यांना धीर देत भाकरी यावेळी थापल्या.
मुलांमध्ये स्त्री पुरुष समानतेची जाणीव व्हावी, तसेच सध्या मुले मोबाईलच्या आहारी गेल्याच्या तक्रारी वाढत होत्या या साठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कांता देवकर यांनी सांगितले.
शाळेतर्फे मुलांसाठी भाकरी थापण्याची स्पर्धा आयोजित करून मुलांना आईच्या कष्टाची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे.
सोनाली मोरे
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष
विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवत या स्पर्धेचा आनंद घेतला.
विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासूनच स्वावलंबन, सफाई,टापटीपपणा , आईच्या कष्टाची जाणीव या गोष्टींची जाणीव निर्माण व्हावी. यासाठी जि. परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी भाकरी थापण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली
होती.
मुलांसाठी भाकरी थापण्याची स्पर्धा आयोजित करून खऱ्या अर्थाने जीवन शिक्षण देण्याचा हा प्रयत्न आहे.
ज्ञानदेव पा. राहणे
शालेय व्यवस्थापन समिती ज्येष्ठ सदस्य
भाकरी बनवताना वाटलं नव्हतं भाकरी थापता येतील. पण प्रयत्न करून बघितला असता भाकरी बनवता आली. भाकरी बनवताना चुलीचा धूर डोळ्यात गेला आणि गोलाकार बनवताना थोडी कसरत करावी लागली. यामुळे आईच्या भाकरीची चव आणि मेहनतीची जाणीव झाली,
कृष्णा लोखंडे
प्रथम विजेता विद्यार्थी
या स्पर्धेत चांगली भाकरी केलेल्या तीन जणांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रथम कृष्णा लोखंडे, द्वितीय चैतन्य चकोर, तृतीय उदय गायकवाड तर मुलींमधून प्रथम वनिता ठाकरे, द्वितीय वैष्णवी चव्हाण, तृतीय क्रमांक आराध्या गायकवाड हिने पटकावला.