विश्व मांगल्य सभेच्या अखिल भारतीय जनप्रतिनिधींची दोन दिवसीय बैठक शिर्डीत संपन्न
विश्व मांगल्य सभेच्या अखिल भारतीय जनप्रतिनिधींची दोन दिवसीय बैठक शिर्डीत संपन्न
विश्व मांगल्य सभेच्या अखिल भारतीय जनप्रतिनिधींची दोन दिवसीय बैठक शिर्डीत संपन्न

शिर्डी विजय कापसे दि १ जुलै २०२५– मातृशक्तीला केंद्रीभूत मानून समाजातील हजारो कुटूंबियांना संस्कार आणि सामर्थ्यांतून जोडण्याचे महत्वपूर्ण कार्य विश्वमागंल्य सभेच्या माध्यमातून करण्याचा संकल्प शिर्डी येथील अखिल भारतीय जनप्रतिनिधी सभेत करण्यात आला. दोन दिवसांच्या बैठकीत वर्षभरातील कार्यक्रम आणि संघटन कार्यक्रमाची योजना निश्चित करण्यात आली असल्याची माहीती विश्व मांगल्य संघटनेच्या अखिल भारतीय संयोजिका डॉ.अनुराधा यादव यांनी दिली.

विश्व मांगल्य सभेच्या अखिल भारतीय जनप्रतिनिधींची दोन दिवसीय बैठक शिर्डी येथे संपन्न झाली. या बैठकीस देशभरातील १३ प्रांतामधील महिला जनप्रतिनिधी उपस्थित होत्या. या परिषदेचे उद्घाटन विश्व मांगल्य सभेचे केंद्रीय परामर्शदाता प्रशांत हरतालकर यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी राष्ट्रीय सहसंघटन मंत्री श्रीमती वृषाली जोशी, सह संघटन मंत्री पुजा देशमुख, श्रीमती गायत्री लोमटे, अखिल भारतीय संपर्क प्रमुख शुभांगी मेंढे, माजी केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती मिनाक्षी लेखीजी, उत्तर महाराष्ट्राच्या संयोजिका सौ.धनश्री विखे पाटील याप्रसंगी उपस्थित होत्या.

बैठकी नंतर पत्रकारांशी बोलताना डॉ.अनुराधा यादव म्हणाल्या की, देशामध्ये ५८ लाख जनप्रतिनिधींचे परिवार आहेत. यामध्ये संसद सदस्य, विधानसभा सदस्य, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, नगरसेवक अशा लोकप्रतिनिधींच्या कुटूंबियाचा समावेश आहे. जनप्रतिनिधींचे कुटूंब हे लाखो लोकांचे असते. समाजा करीता ही कुटूंब प्रेरणास्थान व्हावेत या उद्देशाने आम्ही कार्य करीत आहोत. कुटूंबातील मातृशक्तीला केंद्रीभूत माणून समाजात होणारे बदल अभ्यासून त्यादृष्टीने प्रत्येक कुटूंबात संस्कार देणारी माता निर्माण करण्याचे कार्य आम्ही येणा-या काळात करणार आहोत. यासाठी लाखो परिवार जोडण्यासाठी संघटन मजबुत करण्याचा संकल्प आणि यासाठी वर्षभरातील कार्यक्रमाच्या दोन दिवसांच्या सभेत निश्चित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

सहसंघटन मंत्री पुजा देशमुख यांनी याप्रसंगी समाजातील असंख्य परिवार जोडण्यासाठी छोटे रोपटे आम्ही लावले आहे. त्याचा वटवृक्ष करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. प्रत्येक कुटूंबात चांगले संस्कार आम्हाला द्यायचे आहे. कुटूंबा बरोबरच जनप्रतिनिधींचे कार्यक्षेत्रही सांभाळायचे आहे. त्यादृष्टीनेच भविष्यात संघटनात्मक कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्राच्या संयोजिका सौ.धनश्री विखे पाटील यांनी ४ वर्षांनी ही सभा शिर्डी येथे घेण्याची संधी मिळाली असल्याचा अभिमान व्यक्त करुन, दोन दिवसांच्या बैठकीमध्ये भारतीय संस्कृतीला पुढे घेवून जाण्याच्या दृष्टीने असंख्य परिवारांना संस्कृतीचे ज्ञान देण्याचे कर्तव्य आम्ही करणार आहोत. पुढची पिढी घडविण्यामध्ये मातृशक्तीचा वाटा खुप मोठा असतो. त्यावरच लक्ष केंद्रीत करुन, आगामी काळात कार्य करण्याचा निर्धार या जनप्रतिनिधी सभेत झाला असल्याचे त्यांनी सांगितले.




