जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकी संदर्भात घडामोडी
जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकी संदर्भात घडामोडी
जिल्ह्यात ३ हजार ७६३ मतदान केंद्रांवर होणार मतदान
अहिल्यानगर विजय कापसे दि.२२ ऑक्टोबर २०२४– विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ३ हजार ७६३ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून त्यातील ७४३ शहरी भागात तर ३ हजार २० ग्रामीण भागात आहेत.
पारनेर मतदारसंघात सर्वाधिक ३५४ मतदान केंद्र ग्रामीण भागात असून शेवगाव आणि श्रीगोंदा ३२०, कर्जत जामखेड ३११, अकोले २९४, राहुरी २७५, नेवासा २६१, संगमनेर २३६, शिर्डी २२०, श्रीरामपूर २१५ आणि कोपरगाव मतदारसंघातील २१४ मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत. अहमदनगर शहर मतदारसंघात एकही मतदान केंद्र ग्रामीण भागात नसून सर्व २९७ मतदान केंद्र शहरी भागात आहेत.
अहमदनगर खालोखाल श्रीरामपूर ९६, कोपरगाव ५८, संगमनेर ५२, शिर्डी ५०, शेवगाव ४८, कर्जत जामखेड ४५, राहुरी ३२, श्रीगोंदा २५, नेवासा १५, अकोले १३ आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात १२ मतदार केंद्र शहरी भागात आहेत.
अकोले विधानसभा मतदारसंघात १८३ ठिकाणी केवळ एक मतदान केंद्र असून ३५ ठिकाणी २, तेरा ठिकाणी ३, दोन ठिकाणी प्रत्येकी ४ आणि एका इमारतीत ७ मतदान केंद्र आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघात ७१ ठिकाणी केवळ एक मतदान केंद्र असून ४३ ठिकाणी २, बावीस ठिकाणी ३, पंधरा ठिकाणी प्रत्येकी ४ आणि एका इमारतीत ५ मतदान केंद्र आहेत.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात ३५ ठिकाणी केवळ एक मतदान केंद्र असून ३२ ठिकाणी २, एकोणवीस ठिकाणी ३, दहा ठिकाणी ४, पाच ठिकाणी ५, चार ठिकाणी प्रत्येकी ६, एका ठिकाणी ७, एका ठिकाणी ८ आणि एका इमारतीत १० मतदान केंद्र आहेत. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात ६६ ठिकाणी केवळ एक मतदान केंद्र असून ४३ ठिकाणी २, वीस ठिकाणी ३, सात ठिकाणी ४, चार ठिकाणी प्रत्येकी ५ आणि दोन इमारतीत प्रत्येकी ६ मतदान केंद्र आहेत.
श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात ६८ ठिकाणी केवळ एक मतदान केंद्र असून ३८ ठिकाणी २, एकवीस ठिकाणी ३, तीन ठिकाणी ४, सहा ठिकाणी ५, सहा ठिकाणी ६, दोन ठिकाणी प्रत्येकी ८ आणि एका इमारतीत १० मतदान केंद्र आहेत. नेवासा विधानसभा मतदारसंघात ५४ ठिकाणी केवळ एक मतदान केंद्र असून ४२ ठिकाणी २, वीस ठिकाणी ३, पंधरा ठिकाणी ४, दोन ठिकाणी प्रत्येकी ५ आणि एका इमारतीत ८ मतदान केंद्र आहेत.
शेवगाव विधानसभा मतदारसंघात ११६ ठिकाणी केवळ एक मतदान केंद्र असून ७२ ठिकाणी २, वीस ठिकाणी ३, नऊ ठिकाणी प्रत्येकी ४ आणि दोन इमारतीत प्रत्येकी ६ मतदान केंद्र आहेत. राहुरी विधानसभा मतदारसंघात ८२ ठिकाणी केवळ एक मतदान केंद्र असून ४६ ठिकाणी २, बावीस ठिकाणी ३, दहा ठिकाणी प्रत्येकी ४, एका ठिकाणी ५, एका ठिकाणी ६ आणि दोन इमारतीत प्रत्येकी ८ मतदान केंद्र आहेत.
पारनेर विधानसभा मतदारसंघात ११३ ठिकाणी केवळ एक मतदान केंद्र असून ५५ ठिकाणी २, सतरा ठिकाणी 3, पंधरा ठिकाणी ४, चार ठिकाणी ५ आणि दोन इमारतीत प्रत्येकी ६ मतदान केंद्र आहेत. अहमदनगर विधानसभा मतदारसंघात ५ ठिकाणी केवळ एक मतदान केंद्र असून २० ठिकाणी २, सोळा ठिकाणी ३, अठरा ठिकाणी ४, दहा ठिकाणी ५, पाच ठिकाणी ६, चार ठिकाणी प्रत्येकी ७ आणि तीन इमारतीत प्रत्येकी ८ मतदान केंद्र आहेत.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात ९३ ठिकाणी केवळ एक मतदान केंद्र असून ५९ ठिकाणी २, सोळा ठिकाणी ३, चौदा ठिकाणी ४, एका ठिकाणी ५, तीन ठिकाणी प्रत्येकी ६ आणि एका इमारतीत ७ मतदान केंद्र आहेत. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात १३८ ठिकाणी केवळ एक मतदान केंद्र असून ५५ ठिकाणी २, सोळा ठिकाणी ३, आठ ठिकाणी ४, दोन ठिकाणी प्रत्येकी ५ आणि तीन इमारतीत प्रत्येकी ६ मतदान केंद्र आहेत.
प्रत्येक मतदान केंद्रांवर रॅम्प, पिण्याचे पाणी , विद्युत सुविधा, स्वच्छता गृह, मदत केंद्र आणि माहिती फलक अशा किमान सुविधा असतील. दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिर्डी मतदारसंघात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय लोणी बु. आणि राहुरी मतदारसंघात गजराज नगर जि.प. शाळा येथे प्रत्येकी एक सहाय्यकारी मतदान केंद्र स्थापीत करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात एकूण १४९ पर्दानशीन मतदान केंद्र, ३६ आदर्श मतदान केंद्र, प्रत्येकी १२ महिला, युवा आणि दिव्यांग संचलित मतदान केंद्र असतील. प्रत्येक मतदान केंद्रांवर मतदारांना सुलभपणे मतदान करता यावे यासाठी आवश्यक सुविधा देण्यात येणार आहेत.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांच्या नियुक्त्या
अहिल्यानगर विजय कापसे दि.२२ ऑक्टोबर २०२४– विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १२ मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.
देबशीष बिस्वास (आय.आर.एस.) यांची २१६ अकोले, २१७ संगमनेर, २१८ शिर्डी व २१९ कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.बिस्वास यांच्याशी ८९०२१९९९०० या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह संगमनेर येथे असणार आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून अपर प्रवरा सब डिव्हीजनचे सहायक अभियंता प्रमोद माने यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८६५७५७७७७७,८९७५२२४८१९ असा आहे.
अरुण चौधरी
(आय.आर.एस. सी अँड सीई) यांची २२० श्रीरामपूर, २२१ नेवासा, २२२ शेवगाव व २२३ राहुरी विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.चौधरी यांच्याशी ७०४५६५१५१३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. त्यांचा मुक्काम महात्मा फुले कृषी विद्यापीठ विश्रामगृह राहुरी येथे असणार आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक रोहित निरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७५८८६०४१५१ असा आहे.
ग्यानचंद जैन (आय.आर.एस. सी अँड सीई) यांची २२४ पारनेर, २२५ अहमदनगर, २२६ श्रीगोंदा व २२७ कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आहे. श्री.जैन यांच्याशी ८२६२९८६५१८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह अहिल्यानगर येथे असणार आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून पाणी पुरवठा विभागाचे सहायक शिवम दापकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७२७६२४९९८२ असा असल्याचे निवडणूक शाखेमार्फत कळविण्यात आले आहे.
निवडणूक निरीक्षक ग्यानचंद जैन यांची माध्यम कक्षास भेट
अहिल्यानगर दि. २२- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या माध्यम कक्षास निवडणूक खर्च निरीक्षक ग्यानचंद जैन यांनी भेट देऊन माहिती घेतली. श्री.जैन यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू लाकुडजोडे, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम कक्षाचे समन्वयक अधिकारी अधिकारी डॉ. किरण मोघे, माहिती अधिकारी अमोल महाजन आदी उपस्थित होते.
श्री.जैन यांनी माध्यम संनियंत्रण, जाहिरात प्रमाणिकरण, समाजमाध्यमावरील जाहिरातींचे प्रमाणिकरण, खर्च समित्यांशी साधला जाणारा समन्वय, माध्यम केंद्राचे दैनंदीन कामकाज आदीविषयी माहिती घेतली. दूरचित्रवाणी आणि समाजमाध्यमांवरील जाहिरातींच्या संनियंत्रणासाठी माध्यम कक्षातर्फे करण्यात येणाऱ्या कामकाजाविषयी त्यांनी समाधान व्यक्त केले. माध्यम कक्षात दररोज येणाऱ्या विविध वृत्तपत्रांतील बातम्यांची नोंद घेण्याची आणि जाहिरातींचे अवलोकन करण्याची पद्धत याविषयीदेखील त्यांनी जाणून घेतले.
जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मोघे यांनी माध्यम कक्षाच्या कामकाजाबाबत निवडणूक निरीक्षकांना माहिती दिली.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया मुक्त, निर्भय वातावरणात पार पाडावी -निवडणूक खर्च निरीक्षक ग्यानचंद जैन
अहिल्यानगर दि. २२– निवडणूक प्रक्रिया निर्भय आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या अत्यंत संवेदनशीलपणे पार पाडत समन्वयाने काम करण्याच्या सूचना निवडणूक खर्च निरीक्षक ग्यानचंद जैन यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी शैलेश मोरे, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी राजू लाकुडजोडे उपस्थित होते.
श्री. जैन म्हणाले, भारतीय लोकशाहीला जगात महत्व आहे. देशामध्ये आतापर्यंत झालेल्या निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडल्या गेल्या. भारतीय लोकशाहीला अधिक मजबूत करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकसंघपणे तसेच जबाबदारीने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवाराला ४० लक्ष रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा आहे. उमेदवाराच्या प्रत्येक खर्चावर बारकाईने नजर ठेवावी. ईएसएमएस प्रणालीचा प्रभावीपणे वापर करत अवैध मद्य, रोकड वाहतुकीवर स्थापन करण्यात आलेल्या विविध पथकांनी करडी नजर ठेवावी. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराचा प्रत्येक खर्च नोंद होईल, यादृष्टीने सर्व पथकांनी काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. बैठकीस निवडणुक खर्च निरीक्षणासाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते