भारतीय क्रिकेट संघाचा विजय देशासाठी अभिमानास्पद – आमदार थोरात
विश्वचषक टी-20 विजेत्या भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन

भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर यावर प्रतिक्रिया देताना आमदार थोरात म्हणाले की, टी ट्वेंटी विश्वचषक जिंकणे हे भारतीयांसाठी अत्यंत अभिमानास्पद आहे खरे.तर क्रिकेट हा सांघिक खेळ आहे.अत्यंत मेहनतीने एकजुटीने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या सर्व क्षेत्रांमध्ये भारतीयांनी गौरवास्पद कामगिरी केली असून त्यामुळे अत्यंत अटीतटीच्या लढतीमध्ये दक्षिण आफ्रिकेवर भारतीय संघाने सात धावांनी रोमांचकारी विजय मिळवला.

शेवटच्या काही षटकांमध्ये अत्यंत कठीण परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु सूर्यकुमार यादवने घेतलेला अफलातून झेल हा खेळाचा टर्निंग पॉईंट ठरला. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा यांच्यासह सर्व खेळाडूंनी एकजुटीचे प्रदर्शन करत या विश्वचषकात पहिल्या सामन्यापासून शेवटपर्यंत अपराजित राहत मोठ्या दिमाखात विजय मिळवला आहे हा विजय नक्कीच संस्मरणीय असून देशवासीयांसाठी अभिमानास्पद आहे. या निमित्ताने सर्व भारतीय खेळाडूंची अभिनंदन त्यांनी केले असून क्रिकेटमधून एकात्मता, एकी व सांघिक भावना वाढीस लागते असे सांगताना विद्यार्थ्यांनी व युवकांनी मोबाईल पेक्षा मैदानावर खेळले पाहिजे असा आशावाद ही आमदार थोरात यांनी व्यक्त केला.

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, भारत हा अनेक भाषा ,अनेक वेशभूषा आणि प्रांत असलेल्या देश आहे. परंतु एकजुटीचे प्रदर्शन करत दिमाखदार पद्धतीने जिंकलेला विश्वचषक हा सर्व नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे . रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय खेळाडूंनी एकजुटीचे प्रदर्शन करत हा चषक जिंकला असून रोहित शर्मा आणि विराट कोहली या मोठ्या खेळाडूंनी देशासाठी मोठे योगदान दिले असून त्यांच्या कामगिरीचा हा गौरव असल्याचीही आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे.

तर कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, विश्वचषकाचा अंतिम सामना हा अत्यंत रोमांचकारी झाला. प्रत्येक चेंडू नंतर सामन्यात चढ-उतार येत होते .मात्र रोहित शर्माने अगदी शांतपणे किल्ला लढवत आपल्या संघाला विजय मिळवून दिला .आणि 2023 मध्ये अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाची सल भरून काढली. याचबरोबर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू असल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात शेफाली वर्मा हिने द्विशतक केले तर स्मृती मानधनाने दमदार शतक ठोकत 600 धावांचा विक्रमी डोंगर उभा केला आहे .महिला कसोटीतही भारत विजयाच्या उंबरठ्यावर असून हा क्रिकेटसाठी सोन्याचा दिवस असल्याची त्यांनी म्हटले आहे .या विश्वचषक विजयानंतर संगमनेरमध्ये सर्वत्र मोठा जल्लोष झाला.