देशाच्या व समाजाच्या विकासात शिक्षकांचे मोठे योगदान – माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात
आमदार सत्यजित तांबे व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांच्याकडून शिक्षक बांधवांचे कौतुक

संगमनेर विजय कापसे दि ५ सप्टेंबर २०२५- भारतरत्न माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त आपल्या आयुष्यास मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांप्रती आपण सर्वजण आदर भाव व्यक्त करतो. शिक्षक हे भावी पिढी घडवण्याचे काम करत असून समाजाच्या व देशाच्या विकासात शिक्षकांचे मोठे योगदान राहिले असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे. आमदार सत्यजित तांबे व मा.आ.डॉ.सुधीर तांबे यांनीही शिक्षक बांधवांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षक बांधवांना शुभेच्छा देताना महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, समाजाच्या प्रगतीचा शिक्षण हा राजमार्ग आहे. शिक्षण क्षेत्र हे अत्यंत पवित्र क्षेत्र असून भावी पिढी घडवण्याचे काम या क्षेत्रात काम करणारे सर्व शिक्षक बांधव करत असतात. आई – वडिलांनंतर प्रत्येकाच्या जीवनात गुरूंचा मोठा वाटा असतो. प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन जीवनात वेगवेगळे शिक्षक आपल्याला मार्गदर्शन करत असतात. ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेंबद्दल आपल्या सर्वांना नेहमी आदर असतो. भारत आज जगामध्ये माहिती तंत्रज्ञानात सर्वात शक्तिशाली देश म्हणून ओळखला जातो. किंबहुना इंजिनीयर व तंत्रज्ञान ही आपल्या देशाची ताकद ठरली आहे. वाडी वस्तीवर गरिबांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे याकरता शिक्षणाचा हक्क आपण निर्माण केला. शिक्षण क्षेत्रामध्ये अजूनही अनेक अमुलाग्र बदल करणे गरजेचे असून अत्यंत सेवाभावी पणे काम करणारे गुरुजन यांच्या प्रति समाजाला कायम आदर राहिला असल्याचे ते म्हणाले.

तर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, राज्याचा आणि समाजाचा जर खऱ्या अर्थाने विकास करायचा असेल तर शिक्षण क्षेत्रामध्ये सरकारने मोठी गुंतवणूक करणे अपेक्षित आहे. गुणवत्ता पूर्ण शिक्षण ही प्रत्येक विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे. त्यासाठी सर्व आधुनिक सुविधा शासनाने पुरवल्या पाहिजे. शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक समस्या आहेत परंतु प्रत्येक समस्यांचा पाठपुराव्या करण्यासाठी आपण काम करत आहोत. शिक्षकांनी कायम समाजाच्या विकासासाठी काम केले आहे त्यांच्या प्रतिकृतज्ञता आदर व्यक्त करण्याचा आजचा दिवस आहे.

तर मा.आ.डॉ तांबे म्हणाले की, भारतीय संस्कृतीमध्ये गुरुजनांचे मोठे स्थान आहे. ज्ञानदानाचे पवित्र काम हे व्रत मानून करणाऱ्या सर्व शिक्षक बंधूंचे आज अभिनंदन केले पाहिजे. स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर,डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अशी मोठी परंपरा असलेल्या या क्षेत्रात आजही मोठ्या समस्या आहेत. शासनाने शिक्षण क्षेत्रासाठी आर्थिक संकल्पनातून मोठी भरीव तरतूद केली पाहिजे अशी मागणी करताना पहिली ते बारावी पर्यंतचे सर्व मुलांना शिक्षणही मोफत मिळाले पाहिजे असे ते म्हणाले.
तर कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनीही शिक्षक हे समाजाचे मार्गदर्शक असून सर्व शिक्षक बांधव व भगिनींना तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनेक क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.



