श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पुन्हा उमटला ठसा

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पुन्हा उमटला ठसा
श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पुन्हा उमटला ठसा

Kopargaon vijay kapse दि ४ जुन २०२६–गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्कारमय वातावरण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोपरगाव येथील नामांकित श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय येथे एस.एस.सी. बोर्ड परीक्षा फेब्रुवारी – २०२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे उपस्थित होते.

विद्यालयाने यंदाही आपली उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची चमकदार छाप पाडलेली आहे. एस.एस.सी बोर्ड परीक्षेत साई नारायण कुलकर्णी याने ९७.०० % गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. वेदांत सचिन येवले याने ९५.६० % गुणांसह द्वितीय क्रमांक, तर पार्थ मच्छिंद्र लोहोकणे याने ८६.६० % गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक संपादन केला. तसेच ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला.

प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी साई कुलकर्णी याने आपल्या मनोगतातून यशाचे श्रेय पालक, शिक्षक आणि विद्यालयाने इयत्ता पहिलीपासून ते दहावीपर्यंत दिलेल्या संस्कारक्षम शिक्षणाला दिले. द्वितीय क्रमांकाचा विद्यार्थी वेदांत येवले याने शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, शिस्तबद्ध अभ्यास आणि सकारात्मक शालेय वातावरण हेच यशामागील प्रमुख घटक असल्याचे आपल्या मनोगतातून नमूद केले.

यावेळी कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे सदस्य डॉ. अमोल अजमेरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्पर्धात्मक युगातील संधी आणि आव्हानांची जाणीव करून दिली. यशस्वी होताना आपल्या शाळेशी व संस्कारांशी असलेली नाळ कायम जपावी, असे त्यांनी सांगितले. कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले की कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आधुनिक तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या युगात स्वतःला सक्षम बनवावे. ज्ञान, कौशल्य आणि संस्कार यांच्या बळावर विद्यार्थी भविष्यात मोठे यश संपादन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी स्कूल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, सचिव दिलीप अजमेरे, सहसचिव सचिन अजमेरे, खजिनदार आनंद ठोळे, सदस्य डॉ. अमोलअजमेरे, राजेश ठोळे, संदीप अजमेरे, दीलीप तुपसैंदर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ लकारे, सुरेंद्र शिरसाळे, पर्यवेक्षक बलभीम उल्हारे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगंबर देसाई यांनी केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती, संस्कारक्षम वातावरण आणि विद्यार्थीकेंद्री उपक्रमांमुळे श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय हे कोपरगाव परिसरात नावारुपाला आहे. नव्वद वर्ष पुर्ण होवुन शतकी वाटचालीस सर्वांनी विदयालयाला शुभेच्छा दिल्या.




