सरकार म्हणते दिवाळी गोड करू, पण गोड कोणाची झाली?- खासदार सुळे
सरकार म्हणते दिवाळी गोड करू, पण गोड कोणाची झाली?- खासदार सुळे
सरकार म्हणते दिवाळी गोड करू, पण गोड कोणाची झाली?- खासदार सुळे
संगमनेर विजय कापसे दि २७ ऑक्टोबर २०२५– सरकार म्हणते दिवाळी गोड करू, पण गोड कोणाची झाली? तुमची झाली असेल, कारण शक्तीपीठ महामार्गासाठी तुमच्याकडे तब्बल ८० हजार कोटी रुपये आहेत. पण शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी दहा–वीस हजार कोटी रुपये नाहीत. आणि आता म्हणतात, आम्ही कर्जमाफीबद्दल कधीच बोललो नव्हतो,” असा जोरदार हल्लाबोल खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर चढवला.

सावरगाव घुले (ता. संगमनेर) येथे माजी पोलीस पाटील लाडूजी घुले यांच्या अभिष्टचिंतन सोहळा व शेतकरी मेळाव्यात बोलत होत्या. कार्यक्रमास खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, डॉ. जयश्री थोरात, गणपत महाले, संदीप वर्पे, सुहास वाळुंज, जालिंदर गागरे, गौरव डोंगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या, “सध्याच्या सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पैसे नाहीत, काही महिन्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे उरणार नाहीत. जनजीवन मिशन योजनेची अवस्था वाईट आहे — किती टाक्या बांधल्या, किती पूर्ण झाल्या याचा पत्ता नाही, पण काही ठेकेदारांची बिलं निघाली काहींची निघाली नाही. हे सरकार केवळ दिखावा करतंय.” त्यांनी पुढे सांगितले, “शेतकरी, शिक्षक, ठेकेदार आत्महत्या करत आहेत. शेतीमालाला भाव नाही, आणि सरकार मात्र उत्सव साजरे करतंय. महाराष्ट्रातील सत्ता ही मिरवण्यासाठी नाही; जबाबदारी पार पाडण्यासाठी आहे. पण हे सरकार जनतेचं दुःख पाहण्यास तयार नाही.

“नगर जिल्ह्यात अजूनही पांढरी टोपी, पायजमा आणि कडक टोपी घालणारा शेतकरी आहे, याचा मला अभिमान आहे. आमच्याविरोधात नेते, यंत्रणा आणि सत्ता सगळं होतं, पण मतदारांनी आम्हाला निवडून दिलं. जोपर्यंत मतदार राजा आमच्यासोबत आहे, तोपर्यंत कुणी आम्हाला पराभूत करू शकत नाही. मला लढायला आवडतं, आणि विरोधात बसण्याची मजाही वेगळी आहे.
काही लोक आमच्यावर नेहमी टीका करतात. ते आम्हावर इतकं प्रेम करतात की रोज बोलल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. पण आमचं लक्ष्य शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आहे, टीकेवर नाही. आम्ही विरोधात आहोत, पण जनतेच्या हक्कासाठी लढतोय.” जर भारत सरकारने अमेरिकेला शेती क्षेत्रात प्रवेश दिला, तर आमची मोठी लढाई होईल. शेती म्हणजे आपल्या देशाचं आत्मा आहे. शेतकऱ्याला दुर्लक्षित करून विकास होत नाही.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “सह्याद्रीच्या रांगेतील आमचा पठारभाग पाण्याअभावी नेहमीच संकटात असतो. येथील लोक मेहनती, प्रामाणिक आणि नितळ मनाचे आहेत. लाडूजी घुले यांनी गावासाठी उत्कृष्ट काम केलं आहे. पण आज शेतकरी बिकट परिस्थितीत आहे. महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच बैठकीत कर्जमाफी केली होती, पण सध्याचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं नाही. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या नावावर राजकारण करणं आणि जातीवाद्यांना साथ देणं हे चुकीचं आहे असेही शेवटी थोरात यांनी सांगितले.
“ कांदे, झेंडू, केळी यांना आज बाजारभाव नाही. सरकार म्हणतंय दिवाळी गोड होणार आहे. पण कोणाची दिवाळी गोड झाली? शेतकऱ्यांच्या घरात तर अंधार आहे! तुमच्या घरात मिठाईचे बॉक्स आले असतील, पण शेतकऱ्यांच्या घरी उपासमारी आहे. सरकार एसीत बसतं, गाडीतून फिरतं, आणि आम्ही शेतकरी आत्महत्या करत आहोत. आमची तिरडी गेल्यावर मग कर्जमाफी करणार का?”
– सुप्रिया सुळे ( खासदार )



