आपला जिल्हा

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील- ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

 

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील- ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

 

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या वाटचालीवर ‘भूमिपुत्र’ ग्रंथाची दुसरी आवृत्‍ती नव्‍या स्‍वरुपात प्रकाशित होत आहे. या निमित्‍तने मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केलेले मनोगत.

लोणी विजय कापसे दि ८ ऑगस्ट २०२५मराठीतील प्रसिद्ध लेखक राजा मंगळवेढेकरांनी सर्वप्रथम ‘भूमिपुत्र’ या चरित्र ग्रंथाच्या (सन १९७७) निमित्ताने पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवन कार्याचा वेध घेतला होता. त्यानंतर मा.शिवाजी सावंत यांनी ‘लढत’ भाग १ व २ मधून (१९८६) सविस्तरपणे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवन कार्याला बहुजनांच्याच भाषेत अधिक प्रकाशमान केले. यानंतर मराठीतील सुप्रसिद्ध लेखक आणि पत्रकार अरुण साधू यांनी स्वातंत्र्यापूर्वी ग्रामीण भारतात झालेल्या या सहकार चळवळीचा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि मानसिक असा सर्वांगीण शोध The Pioneer: Life and Time of Vithhalrav Vikhe Patil, Founder of Co-operative Movement in Indian Sugar Industry’ या ग्रंथातून घेतला.

जाहिरात

‘सहकारधुरिण’ ही मराठी आवृत्तीही त्यांनीच संपादित केली होती. विसाव्या शतकाच्या पार्श्वभूमीवर या चळवळीचा शोध घेण्यासाठी या तीनही लेखकांनी सखोल संशोधन करून आपली महत्त्वपूर्ण निरीक्षणे नोंदविली. त्यामुळे प्रवरेच्या तीरावर झालेली ही क्रांती राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली. त्यांच्या या प्रयत्नाबद्दल मी या सर्व लेखकांचा अत्यंत ऋणी आहे.

विठ्ठलराव विखे पाटील हे माझे आजोबा. मी त्यांना बाबा म्हणत असे. त्यांचा जन्म १८९७चा. वयाच्या पंधरा-सोळाव्या वर्षांनंतर त्यांचे सामाजिक जीवनात वावरणे सुरू झाले होते. त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली, त्याला आता शंभर वर्ष उलटून गेली आहेत. प्राथमिक पातळीवरील वैद्यक शास्त्राचे ज्ञान त्यांना अवगत होते.

जाहिरात

ही कला ते त्याच्या वडिलांकडून म्हणजे माझ्या पणजोबांकडून शिकले होते. ते रुग्णाची नाडीपरीक्षा करून, औषधोपचारही करीत आणि लोकांना चार समजुतीच्या गोष्टीही सांगत. त्यातून त्यांचे अनेक कुटुंबाशी नाते जुळत गेले. शंभर वर्षापूर्वी ग्रामीण भागात आरोग्याच्या किती असुविधा होत्या, याची आपण आज कल्पनाही करू शकणार नाही. अशा वेळी दवापाणी करणारे विठ्ठलराव समाजाच्या आदराचे स्थान होणे स्वाभाविक होते. यातूनच त्यांचा लोकांशी संवाद वाढत गेला.

औषधोपचार करता-करता त्यांना खरोखर आजारी असलेला समाजही दिसू लागला, अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मठता, परंपरागतता, बुरसटलेल्या रूढी-परंपरा, विघटीत मनोवृत्ती, दैवाधीनता, आत्मविश्वासाचा अभाव, पराभूत-परावलंबी आणि गुलाम मानसिकता, कमालीचे नैराश्य अशा अनेक रोगांच्या प्रादुर्भावाने समाज अक्षरशः रुग्ण शय्येवरच होता. त्याला तंदुरुस्त करणे सोपे तर नव्हतेच, शिवाय ते कोणा एकट्याचेही काम नव्हते. त्यात परकीय सत्ता. इंग्रज सरकारने सहकाराचा कायदा करूनही त्याला प्रतिसाद नव्हता. केवळ कायदे करून भागत नाही, त्यासाठी जमिनीवर उभं राहून कुणीतरी खंबीर नेतृत्व द्यावं लागतं.

जाहिरात

आपण एकत्र आलो तरच, आपल्या आयुष्यात काही परिवर्तन होईल हा विचार त्यांनी समाजाच्या गळी उतरवण्यास सुरुवात केली. १९२३ साली त्यांनी आमच्या गावात (लोणी बु.) येथे सहकारी पतपेढीची स्थापना केली. त्यांच्या सार्वजनिक कार्याचा हाच तो श्रीगणेशा. आज त्यालाही शंभर वर्ष होऊन गेली आहेत. एका अर्थाने डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केलेल्या सहकार चळवळीचे, त्यांच्या जीवनाचे व त्यांच्या विचारांचे हे शतोकोत्तर विश्लेषण करण्याचीही वेळ आहे, असे म्हणता येईल.

१९२० च्या आसपास स्वातंत्र्य चळवळ गांधीजींच्या अहिंसा तत्त्वाकडे सरकू लागली होती. पुढे ही चळवळ आणखी व्यापक आणि मानवी मूल्यांच्या वाटेने जाणार होती; पण तिला अजून सार्वत्रिक जनाधार मिळाला नव्हता. म.ज्योतीराव फुले, छ.शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अशा जनाधाराची पायाभरणी करण्यास सुरुवात केली होती. याच पातळीवर विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामीण भागात बहुजनांसाठी काम सुरू केले होते. या सर्वांनी समाजाला तत्वज्ञानात्मक विचार दिला, कृतीही दिली; अगदी त्याचप्रमाणे विठ्ठलरावांनी विचाराबरोबर प्रत्यक्ष कृतीचा आदर्शही घालून दिला. ज्यातून एका तत्वज्ञाचा उदय झाला. तो विचार म्हणजे सहकार आणि त्याची प्रत्यक्ष कृती म्हणजे १९५० साली सुरू झालेला पहिला सहकारी तत्वावरील साखर कारखाना. ही ग्रामीण भारताला स्वातंत्र्याची खऱ्या अर्थाने आलेली प्रचीती होती.

जाहिरात

यातूनच पुढे ग्रामीण कृषी-औद्योगिक आणि आर्थिक विकासाचा पाया घातला गेला. त्यानंतर शिक्षणप्रसार, आरोग्य सुविधा निर्माण करण्याच्या प्रक्रियेतून सामाजिक समतेच्या प्रक्रियेला आणि एकात्मिक ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेलाही गती आली. आपण एकत्र आलो, तर काही भव्य दिव्य करू शकतो, हा आत्मविश्वास ग्रामीण समाजाला मिळाला. त्यातूनच ही चळवळ महाराष्ट्र आणि पुढे देशभर पसरली.

सहकार चळवळ वस्तुतः नफ्या-तोट्याचा विचार न करता, ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ’ या तत्वावर आधारित असलेली संरचना आहे. परंतु अलीकडच्या काळात तिलाही उद्योगधंद्याच्या कसोट्या लावण्यास सुरुवात केली जात आहे. त्यातच समाजातील एक विशिष्ट वर्ग-समूह भांडवलशाहीचे समर्थन करतो. वस्तुतः भांडवलदारांच्या जाचाला कंटाळूनच डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळ सुरू केली होती, हे आपल्याला विसरता येणार नाही. अशा वेळी ही चळवळ अधिक पुढे जाण्याऐवजी पुन्हा मागे जाणे समाजाला, देशाला आणि विशेषतः ग्रामीण भागाला परवडणारे नाही, हे विचारात घेणे आवश्यक आहे. याच्या दृष्टीने ‘भूमिपुत्र’ या ग्रंथाच्या आरंभी यशवंतराव चव्हाण यांनी सहकार चळवळीचे आणि विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याचे जे मुलभूत विश्लेषण केले आहे ते आजही सर्वांसाठी मार्गदर्शक ठरणारे आहे.

जाहिरात

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण मूळ धरू लागले आहे. सामाजिक समता, बंधुता आणि स्वातंत्र्य या तत्त्वाऐवजी व्यक्तीस्वातंत्र्य, नफा, अधिक नफा, चंगळवाद, आत्मकेंद्रीतता, संकुचितता, हव्यास, अति महत्त्वाकांक्षा अशा मूल्यांच्या आहारी समाज जाऊ लागला आहे. वस्तुतः सहकार सर्वांना बरोबर घेतो. सामाजिक समता स्वीकारतो, व्यक्तीला प्रतिष्ठा देतो.

याउलट भांडवलशाही काहींनाच बरोबर घेते. भांडवलशाही अभिजनवाद स्वीकारते. विशेष व्यक्तींनाच अमर्याद प्रतिष्ठा देते. साधनांची मालकी व संपत्तीचे केंद्रीकरण करते. अशा वेळी भौतिक सुधारणा घडवीत, व्यक्ती स्वातंत्र्या बरोबरच व्यापक सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला अधिक गतिमान करायचे, की केवळ भौतिकवादी होऊन, स्वैर आणि अनिर्बंध चंगळवादाकडे जायचे, या संदर्भात सहकार निश्चित दिशादर्शक ठरणारा आहे, असे मला वाटते.

आजच्या बदलत्या परिस्थितीत स्वातंत्र्य चळवळीचा, त्यात आहुती दिलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाचा, समाज उन्नतीच्या चळवळीचा,समाज सुधारकांच्या जीवनाचा आणि त्यांच्या कार्याचा अशा सर्वांचाच नव्या पिढीने बारकाईने अभ्यास करणे आवश्यक आहे. याच भूमिकेतून विसाव्या शतकातील ग्रामीण जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याचा आणि त्यांच्या विचारांचा नव्या पिढीला परिचय होणे मला आवश्यक वाटते. त्यातून नव्या पिढीने काही प्रेरणा घ्यावी आणि समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी नवनव्या कल्पना समाजासमोर आणाव्यात. या हेतूने राजा मंगळवेढेकर यांनी लिहिलेल्या ‘भूमिपुत्र’ या ग्रंथाची नवी आवृत्ती काढण्याचे ठरविले.

पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे १२५ वे जयंती वर्ष आणि यंदाचे अंतरराष्‍ट्रीय सहकार वर्ष लक्षात घेवून भूमीपुत्र या ग्रंथाची १९७७ साली प्रथम प्रकाशित झालेली आवृत्‍ती नव्‍या स्‍वरुपात मराठी साहित्‍यामध्‍ये आणण्‍याचा हा केलेला प्रयत्‍न आहे. साहित्‍य आणि सहकार यांची योग्‍य सांगड घालण्‍याचे काम प्रवरा परिवाराने पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या नावाने साहित्‍य कला गौरव पुरस्‍कार देवून सुरु केले. आज ३५ वर्षांची ही अखंडीत परंपरा सहकार चळवळीतील कार्यकर्ते, साहित्‍यप्रेमींच्‍या पाठबळावर यशस्‍वीपणे सुरु आहे. याचा निश्चितच अभिमान वाटतो.

डॉ.राधाकृष्ण विखे पाटील
मंत्री, जलसंपदा,
(गोदावरी व कृष्‍णा खोरे विकास
महामंडळ, महाराष्‍ट्र राज्‍य.)

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे