आपला जिल्हा

भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर

भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार जाहीर

पांडुरंग पाटील, डॉ. हंसराज जाधव, सचिन शिंदे, सागर जाधव जोपुळकर, डॉ. नारायण शिवशेट्टे, भारत सातपुते

 

 कोपरगाव विजय कापसे दि ३ डिसेंबर २०२५  पोहेगाव ता. कोपरगाव येथील भि. ग. रोहमारे ट्रस्ट तर्फे देण्यात येणाऱ्या राज्यपातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून पुरस्कार प्राप्त लेखकांमध्ये पांडुरंग पाटील (राधानगरी, कोल्हापूर), डॉ. हंसराज जाधव(पैठण), सचिन शिंदे(उमरखेड,यवतमाळ), सागर जाधव जोपुळकर,(चांदवड, नाशिक), डॉ. नारायण शिवशेट्टे (अर्जापूर,नांदेड), भारत सातपुते (गातेगाव, लातूर) या लेखकांचा समावेश आहे, अशी माहिती भि. ग. रोहमारे ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे व पुरस्कार योजनेचे कार्यवाह डॉ. जिभाऊ मोरे यांनी येथे दिली.  याप्रसंगी ट्रस्टी श्री. रमेशराव रोहमारे, श्री संदीप रोहमारे,  अॅड्. राहुल रोहमारे व प्राचार्य डॉ. विजय ठाणगे उपस्थित होते. भि. ग.  रोहमारे ट्रस्ट तर्फे १९८९ पासून महाराष्ट्र पातळीवर ग्रामीण साहित्यातील कादंबरी,  कथासंग्रह, कविता संग्रह व समीक्षा या साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट ग्रंथांना दरवर्षी हे पुरस्कार  देण्यात येतात. यावर्षी २०२४ या वर्षातील पुढील ग्रंथांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

जाहिरात
  • नांगरमुठी – पांडुरंग पाटील (ग्रामीण कादंबरी,दर्या प्रकाशन, पुणे)
  • मोहरम – डॉ. हंसराज जाधव (ग्रामीण कथासंग्रह, लोकवाङ्मय गृह प्रकाशन, मुंबई)
  • पातीवरल्या बाया – सचिन शिंदे (ग्रामीण कविता संग्रह, अष्टगंध प्रकाशन, ठाणे) विभागून
  • माती मागतेय पेनकिलर – सागर जाधव जोपुळकर(ग्रामीण कविता संग्रह, अथर्व पब्लिकेशन्स, धुळे) विभागून
  • ग्रामीण आत्मकथनात्मक वाङ्मय : एक अभ्यास – डॉ. नारायण शिवशेट्टे (ग्रामीण समीक्षा, स्वरुप प्रकाशन, छ. संभाजीनगर) विभागून
  • जागरण – भारत सातपुते (ग्रामीण आत्मकथन, मांजरा प्रकाशन लातूर)
    जाहिरात

प्रत्येक साहित्य प्रकारातील ग्रंथांना प्रत्येकी रोख रुपये १५०००/-  स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. यावर्षी कवितासंग्रह, समीक्षा व आत्मकथन या साहित्यप्रकारातील ग्रंथांना हा पुरस्कार विभागून देण्यात आला आहे. ट्रस्टकडे आलेल्या एकूण ५९ साहित्यकृतींपैकी उपरोक्त ग्रंथांची निवड करण्याचे कार्य  डॉ. दिलीप धोंडगे, डॉ. शिरीष लांडगे, श्री. लक्ष्मण बारहाते, डॉ. जिभाऊ मोरे, डॉ. विजय ठाणगे यांच्या संयुक्त निवड समितीने केले.

             वरील ग्रंथांशिवाय निवड समितीने काडीमोडातील काटे (भ.पुं. कालवे), बे दुणे शून्य (रवींद्र रेखा गुरव), घामाचे संदर्भ (किरण भावसार), मृगपक्षी (बाबासाहेब सौदागर), शिदोरीच्या भाकरी (विठ्ठल काष्टे), दंगल होतेच कशी (गौतम ढोके) जमाखर्च आयुष्याचा (बसवंत घेवारे) या ग्रंथांचा उल्लेखनीय ग्रंथ म्हणून विशेष निर्देश केला आहे.

जाहिरात

पुरस्कृत ग्रंथांबद्दल निवड समितीने म्हटले आहे की ” ‘नांगरमुठी’ या ग्रामीण कादंबरीतून नांगर धरलेल्या शेतकऱ्याच्या मुठीतील जगण्याचे तत्वज्ञान साकारते. वारकरी संप्रदायाचे व्यापक अधिष्ठान लाभलेल्या भूमिनिष्ठ कष्टकऱ्यांचे आयुष्य उजागर करते. शेतकऱ्यांचे जगणे-वागणे, श्रद्धा-अंधश्रद्धा, संघर्ष-समन्वय साकारतानाच निसर्ग, ऋतुचक्र, शेती, जनावरे यांच्याशी असणारे नातेही अधोरेखित करते. तर ‘मोहरम’ या हंसराज जाधव यांच्या पहिल्याच  कथासंग्रहामध्ये शेतकरी चळवळ, सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न, कौटुंबिक नात्यांमधील घालमेल असे ग्रामीण भागातील विषय सधन तपशिलांसह येतात. ग्रामीण भागातील सांस्कृतिक बहुविधता, महानुभव पंथीयांची परंपरा, लोकश्रद्धा, शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची अस्वस्थता असे असंख्य अनुभव वाचकांच्या मनाला भिडतात, अस्वस्थ करतात. ‘पातीवरल्या बाया’ संग्रहाचे कवी सचिन शिंदे यांची कविता ही ग्रामीण भागातील आयुष्याच्या जणू नोट्स आहेत. नदी, पूर, दुष्काळ, बाई, गाई-गुरे, गावशिवार, रानवाट, पांडुरंग, प्रेम हे या कवितांचे विषय असून कवीची नाळ शेतीशी आणि तिथल्या मातीशी घट्ट जुळलेली आहे. कवी शहरात राहत असले तरी त्यांच्या कविता वाचताना ग्रामीण जगण्याचा,  तिथल्या जाणिवांचा आणि संवेदनांचा एक हळवा आलेख आपल्या मनात चित्रित होत राहतो. ‘माती मागतेय पेनकिलर’ हा कवितासंग्रह शेती संस्कृतीचे एक जीवघेणे वास्तव अधोरेखित करतो.  कृषी जीवनासह समग्र सांस्कृतिक व्यवस्थेवर अत्यंत प्रभावीपणे आणि स्वतःच्या वेगळ्या भाषेत भाष्य करणारी ही कविता आपल्याला अंतर्बाह्य व्यापून राहते. ‘ग्रामीण आत्मकथनात्मक वाङ्मय : एक अभ्यास’ या ग्रंथाच्या रुपाने ग्रामीण साहित्याची समीक्षा आणि एकूण मराठी साहित्य समीक्षेत भर टाकणारे हे वाङ्मयीन कार्य मोलाचेच आहे. भारत सातपुते यांची ‘जागरण’ ही वाचनीय अशी आत्मकथा आहे. ग्रामीण आणि एकूणच सामाजिक जीवनातले कठोर वास्तव त्यात कथन केले आहे.  सचोटी, चिकाटी, संयम व साहस असणारा माणूस काय करू शकतो हे जागरण वाचल्यावर लक्षात येते.”

कै. के. बी. रोहमारे यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्थापन केलेल्या भि. ग. रोहमारे ट्रस्ट तर्फे सामाजिक कृतज्ञतेच्या जाणि‍वेतून १९८९ पासून हा उपक्रम राबविण्यात येतो. ग्रामीण नवलेखकांच्या निर्मितीक्षम मनांना प्रोत्साहन देणे हा यामागील मूळ उद्देश असल्याचे प्रतिपादन याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अशोकराव रोहमारे यांनी केले.  सदर पुरस्कार वितरणाचे हे ३६ वे वर्ष असून पुरस्कार योजनेचे ३७ वे वर्ष आहे. आजपर्यंत या पुरस्काराने महाराष्ट्रातील १८३ पेक्षा जास्त लेखकांना सन्मानित करण्यात आले आहे. यावर्षीच्या पुरस्कारांचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ख्यातनाम लेखक, संपादक, वक्ते मा. उत्तम कांबळे व महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य डॉ. सुधीर तांबे यांच्या शुभहस्ते कोपरगावचे माजी आमदार तसेच कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष कै. के. बी. रोहमारे यांच्या २८ व्या  स्मृतिदिनी ७ डिसेंबर, २०२५ रोजी सकाळी १० वाजता के. जे. सोमैया कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कोपरगाव जि. अहिल्यानगर येथे केले जाणार आहे. या पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे साहित्य पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमास रसिक व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड्. संजीव कुलकर्णी व प्राचार्य डॉ.  विजय ठाणगे यांनी केले आहे.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे