के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची मतदान जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची मतदान जनजागृती रॅली उत्साहात संपन्न
के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाची मतदान जनजागृती रॅली उत्साहात संपन्न

कोपरगाव विजय कापसे दि ८ डिसेंबर २०२५– के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात भव्य मतदान जनजागृती रॅलीचे आयोजन केले होते. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी शहरातून फेरी काढली. मतदान जनजागृती करणारे विविध फलक हातात घेऊन घोषणा देत विद्यार्थी उत्साहाने शहरातून शिस्तबद्ध पद्धतीने चालत होते. ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, ‘जिंदाबाद जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद’ आदी घोषणांनी अवघे शहर दुमदुमले.

महाविद्यालयाच्या गेट पासून रॅलीला सुरुवात झाली. यावेळी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे, उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य डॉ. ठाणगे यांनी महाविद्यालयाची यामागील भूमिका सांगितली व महाविद्यालयाची लोकशाही व संविधानिक मूल्यांप्रती असणारी बांधिलकी विशद केली.

शहरातील तहसील कार्यालय व पंचायत समिती परिसरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीवर आधारित पथनाट्य सादर केले. त्याला सर्वांनी दाद दिली. तसेच सदर पथनाट्य विद्यार्थ्यांनी शहरात विविध ठिकाणी सादर केले. त्यास नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. रॅलीच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.



