तालुका वाचविण्याबरोबर प्रगतीच्या घोडदौडीसाठी जनतेचा पुन्हा एल्गार – मा.मंत्री बाळासाहेब थोरात

पिंपरने येथील विराट शेतकरी मेळाव्यातून माजी मंत्री थोरात यांचा इशारा; तालुक्यात बेकायदेशीर टोलनाके सुरू

पिंपरने येथे संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा व संगमनेर नगरपालिकेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सुधाकर रोहम, रणजितसिंह देशमुख, नगराध्यक्ष डॉ.मैथिलीताई तांबे, पांडुरंग पा.घुले, लहान भाऊ गुंजाळ, शंकरराव खेमनर, गणपतराव सांगळे, डॉ.जयश्रीताई थोरात, अजय फटांगरे, बाबा ओहोळ, के.के.थोरात,शरद नाना थोरात, सुधाकर जोशी, रामहरी कातोरे, विश्वासराव मुर्तडक, बुवाजी बाबा पुणेकर, राजेंद्र चकोर, यांच्यासह संगमनेर नगरपालिकेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक व विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा.मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पिंपरणे,अंभोरे या परिसराने कायम आपल्यावर प्रेम केले असून नुकत्याच नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शहरातील जनतेने भरभरून मतदान केले. तालुक्यातील जनतेमध्ये उत्साह आणि करंट असून खोटे बोलणारे आता आऊट होतील. चाळीस वर्षांमध्ये काय केले हे वाया गेलेल्या माणसाने विचारले तर त्याला काय उत्तर देणार.

चाळीस वर्षांमध्ये आपण अविश्रांत काम करून निळवंडे धरण,कालवे, शहरात व प्रत्येक गावात पायाभूत विकासाच्या सुविधा निर्माण करताना समृद्ध सहकार निर्माण केला. आज राज्यामध्ये कुठेही गेले तरी संगमनेरचे नाव घेतले जाते. संगमनेरचा लौकिक वाढवला. शांतता, सुव्यवस्था, बंधुभाव यामधून तालुका वैभवशाली निर्माण केला. 1985 मध्ये तालुक्यात सर्वाधिक हायस्कूल आणि पतसंस्था आपण निर्माण केल्या. पिंपरने हायस्कूल सुद्धा आपण दिले. तालुक्यातील विरोधकांना संस्था दिल्या ते ही मान्य करतात. कधी भेदभाव केला नाही. राज्य पातळीवर काम करताना प्रत्येक खात्यामध्ये दिशादर्शक काम केले. ऑनलाईन सातबारा हे महसूल मंत्री पदाच्या काळातील काम आहे तर शिक्षणाचा मूलभूत अधिकार आपण दिला. राज्यात आजही संगमनेर तालुक्याचे सन्मानाने नाव घेतले जाते. आपणही मंत्री राहिलो कधीही चुकीचे काम केले नाही. तुम्ही चाळीस वर्षात काय केले हे पहिले सांगा तुम्हाला साधा नगर – मनमाड रस्ता करता आला नाही.
निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. त्यामध्ये ज्यांचे कोणतेच योगदान नाही ते आज जलदूत होत आहेत. उलट अडथळे निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. संगमनेर तालुक्याचा विकास त्यांना पहावत नाही.म्हणून बनवाबनवीचा खेळ त्यांचा सुरू आहे.

तालुक्यात वाळू तस्करी वाढली आहे. बिगरकष्टाचा पैसा तरुणांना पुरवला जात असून पिढी उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू केले आहे. तालुक्यामध्ये आमली पदार्थाची तस्करी,गुंडगिरी, दहशत वाढली आहे. यामागे बेकायदेशीर टोल नाके आणि हप्ते खोरी आहे. हे आपल्याला बंद करायचे आहे. कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकल्या जात आहे. अगदी महिलांनाही सुद्धा दमदाटी सुरू आहे.याला पाहू, त्याला पाहू असे वातावरण तालुक्यात कधी नव्हते.
तालुक्याजवळ विमानतळ आपण आणले. रेल्वेसाठी पाठपुरावा केला. 370 कोटी रुपये शेतकऱ्यांना जमिनीचे दिले. अकोले तालुक्यातील रेल्वे जाण्यास आपली हरकत नाही. पुणे – नाशिक रेल्वे मार्ग सरळ रेषेत संगमनेर वरून जातो. मात्र मागील एक वर्षांमध्ये या रेल्वे मार्गाची दिशा बदलली. आता अकोले संगमनेर मध्ये भांडण लावण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे.
आपल्यातील गट तट विसरून दोष दुरुस्त करा. अन्यथा गुलामगिरी स्वीकारावी लागेल. विरोधक जे आहे त्यांनी सुद्धा आता विचार केला पाहिजे. नैतिकता हा आपल्या राजकारणाचा पाया असून सुमारे दहा हजार कोटींची उलाढाल तालुक्यात होत आहे. हे कष्टाचे फळ आहे. हे वैभव आपल्याला जपायचे असून बेकायदेशीर टोल नाके बंद करायचे असल्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, संगमनेर तालुका हा सहकाराची पंढरी असून विकासाचे मॉडेल आहे. मागील 40 वर्षात हा तालुका बाळासाहेब थोरात साहेब यांनी उभा केला आहे. मात्र मागील एक वर्षांमध्ये तालुक्याचे नाव घालवण्याचे काम नवीन लोकप्रतिनिधी करत आहे. तालुक्याचा स्वाभिमान व अस्मिता जपण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहा असे आवाहन त्यांनी केले.
तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आपल्या कार्यकर्त्यांनी तालुक्यासाठी गटतट विसरून एकत्र आले पाहिजे. नगरपालिकेचे यश हे एकजुटीमुळे मिळाले असून आपल्याला वारसा नव्हे तर साहेबांनी दिलेली जनसेवेची जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडू असे त्या म्हणाल्या. तर सुधाकर रोहम म्हणाले की टीका करताना, आपली पात्रता लक्षात घेऊन टीका केली पाहिजे. ज्यांचे काही योगदान नाही ते लोक बोलत आहेत.यांनी किती पक्ष बदलले ते अगोदर चेक करा असे आवाहन त्यांनी जनतेला केले. याप्रसंगी शंकरराव खेमनर, गणपतराव सांगळे, डॉ.मैथिलीताई तांबे, शरद नाना थोरात, अण्णासाहेब राहिंज, शिवाजी जगताप, लहानु वर्पे, योगेश खेमनर, ॲड शंकर खेमनर, आराध्या राहिंज, रामेश्वर पानसरे, यांनीही विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच मीनानाथ जोर्वेकर यांनी केले सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर तालुकाध्यक्ष अजय फटांगरे यांनी आभार मानले. यावेळी सुमारे दहा ते पंधरा हजार नागरिक महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भव्य मिरवणूक हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले.
नाद करायचा नाही – शरद नाना थोरात यांचा कडक इशारा
नवीन लोकप्रतिनिधी दमदाट्या करत आहे. आम्ही गाफील राहिलो. आमची चूक झाली म्हणून तुमच्याकडे सत्ता आली. सत्ता तुमच्या कर्तुत्वाने मिळालेली नाही. दुसऱ्याच्या इशाऱ्यावर तालुका चालू देणार नाही. यापुढे तुम्हाला वाचवायला आता नाना येणार नाही. हे सब शहरी आणि एक संगमनेरी आहेत. नाद करायचा पण संगमनेर तालुक्याचा नाही असा सूचक आणि कडक इशारा शरद नाना थोरात यांनी नवीन लोकप्रतिनिधी यांना दिला आहे.



