आधुनिक शेडनेट शेतीतून कमी खर्चात चांगले उत्पादन – माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा
सावरगाव घुले येथे प्रगतीशील शेतकरी मंगेश ढोकरे यांच्या आधुनिक शेतीला मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट

संगमनेर विजय कापसे दि ५ जानेवारी २०२६– पारंपारिक शेतीपेक्षा आधुनिक पद्धतीने शेती केल्यास हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर ठरेल. सेंद्रिय शेती करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असून आधुनिक शेडनेट पद्धतीच्या वापरामधून कृषी उत्पादनात मोठी वाढ होत असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सावरगाव घुले येथे प्रगतीशील व आदर्श शेतकरी म्हणून ओळख असलेल्या मंगेश ढोकरे यांच्या शेतीला मा.कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली. त्यांच्या अत्याधुनिक शेती व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी करून व त्यांच्याशी संवाद साधून समाधान व्यक्त करण्यात आले.
मंगेश ढोकरे यांनी एकूण 13.5 एकर क्षेत्रावर अत्याधुनिक शेडनेट हाऊस उभारले असून, यामध्ये कोठे खुर्द येथील 4.5 एकर आणि सावरगाव घुले येथील 9 एकर क्षेत्राचा समावेश आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते शेडनेट पद्धतीने कलर शिमला मिरचीचे यशस्वी उत्पादन घेत आहेत. सध्या 11 एकर क्षेत्रावर कलर शिमला मिरची तर 2.5 एकर क्षेत्रावर एक्स्पोर्ट दर्जाच्या केळीची लागवड करण्यात आलेली आहे. शेडनेट शेतीमुळे ऊन, वारा, पाऊस तसेच विविध किडींपासून पिकांचे प्रभावी संरक्षण होते. विशेषतः कलर शिमला मिरची हे पीक जास्त तापमान सहन न करणारे असल्याने ओपन शेतीमध्ये त्याची लागवड शक्य नसते. त्यामुळे शेडनेट पद्धतीने घेतलेले उत्पादन अधिक दर्जेदार व फायदेशीर ठरत आहे.

पठार भाग असूनही पाण्याचे सुयोग्य नियोजन करत मंगेश ढोकरे यांनी 2.5 एकर क्षेत्रात सुमारे 75 फूट खोल शेततळे उभारले आहे. या शेततळ्यात सुमारे 4 कोटी लिटर पाणीसाठा होतो. पावसाचे पाणी साठवून उन्हाळ्यातही बागायती शेती यशस्वीपणे फुलवण्याचे हे नियोजन निश्चितच इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, अत्यंत शिस्तबद्ध नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि मेहनतीच्या जोरावर तरुण शेतकरी मंगेश ढोकरे यांनी शेती कशी करावी याचे उत्तम उदाहरण उभे केले आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीतून परिसरातील शेतकऱ्यांना नवी दिशा मिळत आहे. मंगेश ढोकरे यांच्या नवीन शेती पद्धतीचा सर्व युवकांनी आदर्श घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी समवेत डॉ.जयश्रीताई थोरात यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.




