लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी ४० वर्षात तालुका उभा केला तुम्ही एक वर्षात नाव घालवले

पिंपरने येथील शेतकरी मेळाव्यातून जनतेचा महायुतीला थेट इशारा
तालुक्याची घडी विस्कळीत होऊ देणार नाही – माजी मंत्री बाळासाहेब थोरात समर्थक कडाडले

संगमनेर विजय कापसे दि ६ जानेवारी २०२६– लोकनेते बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व आहेत. सतत काम करून तालुका वैभवशाली बनवत त्यांनी तालुक्यातील सर्व सामान्य माणूस उभा केला. तालुक्याचा लौकिक वाढवला. समृद्धता आली. निर्माण झालेले वैभव हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे असून तुम्ही एक वर्षांमध्ये तालुक्याचे नाव घालवले यापुढे तुमची दहशत खपवून घेणार नाही असा खणखणीत इशारा लोकनेते बाळासाहेब थोरात समर्थकांनी भव्य शेतकरी मेळाव्यातून नवीन लोकप्रतिनिधी व पालकमंत्री यांना दिला आहे.

संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पिंपरने येथील शेतकरी मेळाव्याकडे संगमनेर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या मेळाव्यात उत्स्फूर्त झालेली गर्दी, युवक व महिलांचा सहभाग आणि त्यातून आक्रमकपणे थोरात समर्थकांनी मांडलेली भूमिका हा जिल्हाभर चर्चेचा विषय ठरला आहे.

चाळीस वर्षात काय केले या प्रश्नाला उत्तर देताना ज्येष्ठ नेते सुधाकर रोहम म्हणाले की, टीका करताना प्रत्येकाने आपली पात्रता ओळखली पाहिजे. लोकनेते बाळासाहेब थोरात हे राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व आहे त्यांच्यावर टीका करताना लायकी पहावी. तुम्ही किती पक्ष बदलले. तुम्ही काय काम केले. हे जनतेला माहित आहे. तुमची दादागिरी दहशत आता कोणीही खपवून घेणार नाही. उद्या आरपीआयची सत्ता आली तर ही सर्व मंडळी आरपीआय कडे येतील असा टोला त्यांनी लगावला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम सर्वांना शांत बसवण्याचे काम केले मात्र यापुढे कार्यकर्त्यांनी जशास तसे उत्तर द्यावे असे आवाहन केले.
शरद नाना थोरात म्हणाले की, विधानसभेमध्ये तुम्हाला यश मिळाले हे तुमच्या कर्तुत्वाने नाही. आमच्या कार्यकर्त्यांची चूक झाली. त्यामुळे चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली. यापुढे तालुक्यात दहशत दडपशाही खपवून घेणार नाही. नाद करायचा पण आपला नाही. असा इशारा त्यांनी दिला.
तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात सुमारे दहा हजार कोटींची उलाढाल होते आहे तालुक्याचा लौकिक वाढलेला आहे सहकाराची पंढरी संगमनेर तालुका आहे मात्र मागील एक वर्षात नवीन लोकप्रतिनिधी नाव घालवले आहे.

शिवाजी जगताप म्हणाले की, तुमचे किती उद्योग सुरू आहे. ते जनतेला माहिती आहे. यापुढे नेतृत्वावर बोलाल तर तालुक्यात फिरू देणार नाही. शंकरराव खेमनर,गणपतराव सांगळे, अण्णा रहिजं यांच्यासह शालेय विद्यार्थिनी आराध्या राहिजं हिने सुद्धा सत्ताधाऱ्यांवर टीका केली.
तरुणाईचा आक्रमकपणा, कार्यकर्त्यांची एकजूट, प्रचंड मोठा जनसमुदाय, मोठा उत्साह यातून संगमनेर तालुका एकवटल्याचे चित्र निर्माण झाले असून सौ शहरी एक संगमनेरी हा नारा देत संगमनेर तालुका हा एक परिवार आहे तो आपल्याला जपायचा आहे असा मंत्र घेऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा विश्वास दिला.
चौकट
संगमनेर तालुक्याचा राज्यात लौकिक निर्माण केला – माजी मंत्री बाळासाहेब थोरात
सहकार, शिक्षण, शेती, समृद्ध बाजारपेठ यामधून संगमनेर तालुक्याचा आपण राज्यात लौकिक निर्माण केला. निळवंडे धरण, कालवे, हायटेक बस स्थानकासह वैभवशाली इमारती, राज्यातील बेस्ट सहकार, विकासाच्या योजना,गावोगावी दूध संस्था ,शाळा, रस्ते अशा मूलभूत सुविधा राबवताना तालुक्यातील गोरगरीब माणसाच्या जीवनात आनंद निर्माण केला. नैतिकतेचे राजकारण केले कधीही भेदभाव केला नाही. तालुक्यात आनंदाचे आणि बंधूभावाचे वातावरण कायम ठेवले. हे एका दिवसामध्ये झाले नाही त्यासाठी कष्ट करावे लागले. जे केले ते एकदम बेस्ट केले. काही लोकांना तालुक्याचा विकास पहावत नाही म्हणून ते बनवाबनवी करत आहे. बेकायदेशीर वाढलेले टोल नाक्यांमुळे तालुक्यात अमली पदार्थांची तस्करी, दहशत व गुंडगिरी वाढली असून हे सर्व थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करा असे आवाहन मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी करताच उपस्थित हजारो जनतेने उभे राहून त्यांच्या अहवानाला प्रतिसाद दिला.



