हरित क्रांतीचे प्रणेते – डॉ.अण्णासाहेब शिंदे

हरित क्रांतीचे प्रणेते – डॉ.अण्णासाहेब शिंदे

संगमनेर विजय कापसे दि २० जानेवारी २०२६-15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झालेल्या भारताची खर्या अर्थाने विकासाची वाटचाल सुरू होणार होती. पारतंत्र्यात राहिलेला देश,वाढलेली लोकसंख्या, अन्नधान्यांचा मोठा तुटवडा,अपुरी साधनसामुग्री यातून खडतर मार्ग काढत तत्कालीन नेत्यांनी देशाच्या समृध्द विकासाचा पाया घातला. यात अन्नधान्यासाठी व्याकूळ झालेला देश ते आजचा अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला भारत देश यामध्ये महत्त्वाची भूमिका असलेले पहिल्या हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे सुपुत्र डॉ.अण्णासाहेब शिंदे होय.


1944 ते 48 अहमदनगर जिल्ह्याच्या कम्युनिस्ट चळवळीत अग्रभागी राहिले.बाणेदारपणा,प्रचंड बुद्धिमत्ता, नवीन तंत्रज्ञानाची व विकासाची दृष्टी हे गुण त्यांच्यामध्ये उपजत होते.स्वातंत्र्यप्राप्तीनंतर काही काळ श्रीरामपूर येथे त्यांनी वकिली केली.यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहास्तव ते राजकारणात आले.खंडकरी शेतकर्यांचे ते नेते बनले. शेतकर्यांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी लढा दिला.1962 मध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली.या विभागाचे प्रतिनिधित्व करताना त्यांना केंद्रामध्ये राज्यमंत्री मिळाले.
याच पदाने संपूर्ण देशाच्या कृषी क्षेत्राला नवा आयाम दिला.भारतात अन्नधान्याचे मोठे दुर्भिक्ष निर्माण झाले होते. अन्नधान्य हीच मोठी समस्या होऊन विकासात मोठा अडचण निर्माण झाला होता. यावर डॉ.अण्णासाहेब शिंदे यांनी काम केले. परदेशात वापरल्या जाणार्या कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास केला.यातून देशांमध्ये नवीन हरित क्रांतीची सुरुवात केली.‘‘ कमी पाणी,कमी श्रम व जास्त उत्पादन ’’ ही संकल्पना राबवून नवनवीन बियाण्यांचा वापर त्यांनी केला.शेतीला पारंपरिक व्यवसायातून बाहेर काढून त्याला व्यवसायिक रुप दिले. शेतकर्यांच्या हाताला काम आणि दाम दोन्ही मिळवून दिले. वाहून जाणार्या पाण्याचा वापर करून शेतीसाठी सुरू झाला.विविध पालेभाया व फळभाया पिकांचे उत्पादन वाढले.कृषी क्षेत्र व संशोधनाला बळ दिले.त्यामुळे या व्यवसायाला प्रोत्साहन मिळाले.आणि प्रतिष्ठाही मिळाली.
अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा व साखरेचा जिल्हा म्हणून राज्यातच नव्हे तर देशात ओळखला जातो.याच्या पायाभूत विकासात मार्गदर्शन व महत्त्वपूर्ण योगदान देणारे डॉ. अण्णासाहेब शिंदे होय.जिल्ह्यातील सहकार तत्वावरील साखर कारखान्यांनी त्यांनी मोठे प्रोत्साहन दिले.केंद्रीय मान्यता व मदत मिळवून दिली. पुढे हेच साखर कारखाने त्या त्या तालुक्याच्या व विभागाचे कामधेनू बनून उभे राहिले आहेत.
जिल्ह्याच्या व देशाच्या इतिहासात डॉ.अण्णासाहेब शिंदे यांचे मोठे योगदान आहे मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. स्वच्छ पेहराव, साधी राहणी,उच्च बुद्धिमत्ता यामुळे अण्णासाहेबांचे व्यक्तिमत्व प्रत्येकाला आपलेसे वाटायचे. त्यांनी राजकारणातही स्वातंत्र्य सैनिकाचे भूमिकेतून काम केले.स्वातंत्र्यपूर्व व स्वातांत्र्योत्तर काळात काम करताना प्रचंड वाचन ही त्यांनी केले.
संगमनेर तालुक्याच्या विकासाचा पाया घालताना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना बहुमोल मार्गदर्शन व मदत ही त्यांनी केली.कृषी समस्या व अन्नधान्य समस्या,1965 चे भारत पाकिस्तान युद्ध, शेती व पाणी, इस्त्राईलची तोंडओळख हे पुस्तकही त्यांनी लिहिले. कृषिक्षेत्रात हरितक्रांती निर्मिती बरोबर बहुमोल योगदान देण्याबद्दल त्यांना 1976 मध्ये कृषिरत्न या कृषी क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने भारत सरकारच्या वतीने गौरवण्यात आले. तर 1982 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाने त्यांना डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले. केसरी मराठा, रामशास्त्री प्रभुणे या मानाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला.
त्यांनी आपल्या जिवनकाळात राष्ट्रीय साखर कारखाना सहकारी फेडरेशन चे अध्यक्ष,महाराष्ट्र पाटबंधारे विभागाचे सदस्य,महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन मंडळाचे उपाध्यक्ष,नाबार्डचे संचालक, महाराष्ट्र नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष अशा विविध भूमिका वर काम करताना शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय मिळवून दिला. देशाच्या,राज्याच्या इतिहासामध्ये हरितक्रांती आणणारे हरित व कृषी क्षेत्राच्या पाया घालणारे हे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे यांचे विचार व कार्य पुढील पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी ठरणार आहेत.अशा या महाराष्ट्राच्या सुपुत्रास विनम्र अभिवादन- मा.आ.डॉ.सुधीर तांबे



