राजहंसच्या मिशन ५० लिटर मुळे दुसरी दुग्ध क्रांती–दलजीतसिंग

कमी गाई जास्त दूध हे सूत्र वापरा–लोकनेते बाळासाहेब थोरातसंगमनेर तालुका सह. दूध संघाच्या वतीने 1500 तरुण दूध उत्पादकांची कार्यशाळा संपन्न
दूध उत्पादक नव्हे, दूध उद्योजक–रणजीतसिंह देशमुख

Sangmner vijay kapse दि ३० मार्च २०२६-लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातून संगमनेर तालुक्यात समृद्धी निर्माण झाली आहे. संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जात असून आगामी काळामध्ये पंजाब प्रमाणे दुग्ध क्षेत्रात क्रांती करण्याकरता रणजीत सिंह देशमुख यांच्या पुढाकारातून सुरू झालेल्या मिशन 50 लिटर क्षमतेच्या गाई गाई निर्मितीमुळे राज्यात दुसरी दुग्ध क्रांती होईल असे गौरव उद्गार पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल यांनी काढले आहे. तर कमी गाई जास्त दूध हे सूत्र आगामी काळात वापरा असे आवाहन मा. महसूल व कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

वसंत लॉन्स येथे संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वतीने मिशन 50 लिटर दुग्ध क्रांती पुन्हा एकदा या तालुक्यातील 1500 युवक दूध उत्पादकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात राजहंस दूध संघ व महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशनचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, पंजाबचे पीडीएफएचे खजिनदार राजपालसिंग, सुखदेवसिंग, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्री थोरात, व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, उदय तिवारी, डॉ समध, लक्ष्मणराव कुटे, रामहरी कातोरे ,नवनाथ आरगडे, दूध संघाचे संचालक, विलास वरपे, भास्करराव सिनारे, रमेश गुंजाळ, विलास कवडे, संतोष मांडेकर, बादशहा वाळुंज, विक्रम राजे थोरात, संजय पोकळे, बबनराव कु-हाडे ,विष्णू ढोले ,तुकाराम दातीर, रवींद्र रोहम ,डॉ.प्रमोद पावसे, भारत मुंगसे, सौ प्रतिभा सोमनाथ जोंधळे, सौ मंदा गोरख नवले, कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, विनोद हासे यांच्यासह विविध व्हेटर्नरी डॉक्टर त्याचप्रमाणे तालुक्यातील युवक दूध उत्पादक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना पंजाब पीडीएफचे अध्यक्ष दलजीतसिंग गिल म्हणाले की, पंजाब हे राज्य कृषी व दूध उत्पादनामध्ये देशात अग्रेसर आहे. कृषी क्षेत्रामध्ये पंजाबने केलेले संशोधन हे संपूर्ण देशामध्ये जात आहे .रणजीत सिंह देशमुख 2009 पासून पंजाब मधील दूध उत्पादकांच्या संपर्कात असून त्या माध्यमातून एमडीएफ गोठा ,मुरघास या संकल्पना महाराष्ट्रात राबवल्या गेल्या आहेत. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका म्हणून ओळखला जातो. आगामी काळामध्ये पन्नास लिटर दूध निर्मिती हे मिशन घेऊन संगमनेर मधून काम सुरू झाले आहे. हा महाराष्ट्रासाठी संगमनेर पॅटर्न ठरणार आहे. या मिशनमुळे राज्यात नवी दुग्ध क्रांती होणार असून या कामांमध्ये पंजाब चे शेतकरी सर्वतोपरी मदत करतील असे सांगताना पंजाबी आणि मराठा यांनी एकत्र लढून कायम देश हिताचे काम केले असल्याचे ते म्हणाले.

तर माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 1978 मध्ये पंजाब मधून गाई आणून आपण दूध उत्पादन सुरू केले. दूध संघाचे जे चेअरमन आतापर्यंत झाले त्यांनी आतापर्यंत खूप चांगले काम केले. याचबरोबर दूध संघाच्या माध्यमातून तालुक्याची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. संघाच्या इतिहासातील हा अत्यंत सुंदर कार्यक्रम असून रणजीतसिंह देशमुख यांनी मुक्त संचार गोठा आणि मुरघास ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबविली. याचबरोबर कोरोना संकट काळामध्ये त्यांच्या पुढाकारातून दररोज 10 लाख लिटर दुधाची पावडर सरकारने बनवली त्यामुळे शेतकऱ्यांना एकही दिवस बंद न न घेता दूध पुरवठा सुरू ठेवता आला. दूध व्यवसायामध्ये कमी गाई आणि जास्त दूध हे सूत्र आपल्याला राबवावे लागणार आहे. मिशन 50 लिटर हा अत्यंत चांगला उपक्रम असून ही सर्वांनी मोहीम म्हणून राबवा.
गोठ्याची स्वच्छता, गायींचे प्रजनन, गाईंचे आरोग्य ,गोठा व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे असून स्वच्छ व निर्भिळ दूध निर्माण झाले पाहिजे. अगदी तान्या बाळाच्या मुखात जाणारे हे दूध असते. सहकारी दूध संघामुळे खाजगी दूध दूध संघांना ही चांगला भाव द्यावा लागतो. कारण खाजगी दूध संघाचा नफा हा त्यांचा स्वतःचा असतो. सहकाराने नागरिकांच्या जीवनात आनंद निर्माण केला असून सहकार हा सर्वांचा आहे तो टिकला पाहिजे असे ते म्हणाले
तर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा आदर्श वारसा घेऊन लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्याच्या सहकारातील संस्था काम करत आहे. मिशन 50 लिटर अंतर्गत 50 लिटर दूध देणाऱ्या गाई आपल्याला निर्माण करावयाचे आहेत. याकरता पंजाब मधून 11 महिन्याच्या कालवडी आणून त्यांच्यावर इम्पॉर्टंट सॉर्टेड सिमेंन वापर करणे हा एक पर्याय आणि दुसरे म्हणजे आपल्या गोठ्यामध्ये पंजाब सारख्या इम्पोर्टेड सिमेंनच्या गाई निर्माण करणे. तीन वर्षांमध्ये पहिली पिढी ,पुढील दोन वर्षांमध्ये दुसरी पिढी, तर सात वर्षात तिसरी पिढी या कालावधीने गाई निर्माण करणे शक्य आहे. जास्त उत्पादनाच्या गाईंसाठी चारा व्यवस्थापन, गोठा व्यवस्थापन आणि प्रजनन व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्याकडे मुरघास चा सर्रासपणे चांगला वापर होत असून त्यामधील 28 प्रकारचे घटक सुद्धा तपासणे गरजेचे आहे .याचबरोबर काऊ कंफर्ट अंतर्गत गाईंना बसण्यासाठी मऊ जागा असणे गरजेचे आहे. प्रत्येक गोठ्यात स्वच्छतेबरोबर कालवडींचे संगोपन चांगले झाले पाहिजे असे सांगताना त्यांनी मिशन 50 लिटर बाबतची तांत्रिक माहिती दिली. याचबरोबर दूध उत्पादकांनी आता दूध उद्योजक बनावे असे आवाहन करत सहकाराशिवाय शेतकरी व सर्वसामान्यांना पर्याय नसून सहकारामुळे संगमनेर तालुका फुलला आहे. हा सहकार टिकवण्याबरोबर राजहंस हा विश्वासाचा ब्रँड झाला असल्याचे ते म्हणाले
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय तिवारी यांनी केले सूत्रसंचालन डॉ कोमल मस्के यांनी केले तर डॉ प्रमोद पावशे यांनी आभार मानले. यावेळी संगमनेर तालुक्यातील युवक शेतकऱ्यांबरोबर त्यांच्या पत्नी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रत्यक्ष गाई व्यासपीठावर
पंजाब मधील गाई 50 लिटर पेक्षा जास्त दूध देत असून महाराष्ट्रातील गाई आणि पंजाबमधील गाई यामधील फरक दाखवण्यासाठी प्रत्यक्ष गाई कार्यक्रम स्थळी व्यासपीठावर आल्या यावेळी चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांनी विविध जैविक बाबी उपस्थित यांना समजावून सांगितल्या याचबरोबर दूध उत्पादकांनी आता दूध उद्योजक बनावे व मिशन 50 लिटर मोहिमेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.
महाराष्ट्र व पंजाब मध्ये करार
मिशन 50 लिटर मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी पंजाब प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशन व महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर असोसिएशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यामधून दोन्ही राज्यातील माहितीची देवाण-घेवाण, याचबरोबर, दुग्ध क्षेत्रातील अनुभव, नवनवीन प्रयोग, संशोधन याबाबतचा करारावर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख व पंजाबचे अध्यक्ष दलजीत सिंग यांनी स्वाक्षऱ्या केल्या.




