कर्मवीर अण्णांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्ञानार्जन करावे

कर्मवीर अण्णांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्ञानार्जन करावे
ह.भ.प. सचिन पवार; संवत्सरच्या जनता इंग्लिश स्कूलमध्ये कर्मवीर जयंती उत्साहात
Kopargaon vijay kapse दि २७ सप्टेंबर २०२६ : विद्यार्थ्यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ज्ञानार्जन करावे, असे प्रतिपादन वारकरी दर्पण, पुणेचे संपादक ह.भ.प. सचिन पवार यांनी केले.

संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूलमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संवत्सरचे माजी सरपंच व ज्येष्ठ सदस्य तथा स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य चंद्रशेखर देशमुख होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी व पुणे येथील जीएस २४ इंटेरिया सोल्युशनचे संचालक संभाजी मगर उपस्थित होते. तसेच रयत शिक्षण संस्थेचे सातारा येथील मॅनेजिंग सदस्य अॅड. संदीप वर्पे, मॅनेजिंग सदस्य सुरेश बोळींज, माजी जिल्हा परिषद सदस्य व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, नामदेवराव परजणे दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे, माजी सरपंच चंद्रकांत लोखंडे, बाळासाहेब बारहाते, सामाजिक कार्यकर्ते संजय काळे, स्थानिक स्कूल कमिटीचे मधुकर साबळे, उपसरपंच विवेक परजणे, अॅड. शिरीष लोखंडे, पांडुरंग शिंदे, औद्योगिक वसाहतीचे संचालक सोमनाथ निरगुडे, पंडित भारूड, गोवर्धन परजणे, माजी संचालक फकीरराव बोरनारे, मारुती लोखंडे, बाळासाहेब आबक, पोलीस पाटील लीना आचारी, भाऊसाहेब परजणे, अरुण बोरनारे सर, सचिन काळे, पर्यवेक्षक एम.जी. भोये सर आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक व्ही.के. जेजुरकर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मॅनेजिंग सदस्य सुरेश बोळींज, अॅड. संदीप वर्पे, संजय काळे, ज्ञानेश्वर परजणे आदींनी मनोगत व्यक्त केले. आपल्या व्याख्यानात ह.भ.प. सचिन पवार यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा आढावा घेत त्यांच्या कौटुंबिक व सामाजिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला. समाजातील वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोहोचविण्यासाठी कर्मवीर अण्णांनी केलेल्या कार्यातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे आभार शिंदे सर यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




