गुन्हेगारांना कोणतीही मुभा नाही; आरोपीचे अतिक्रमित घर हटवणार, मंदिर परिसरासाठी नवे धोरण : डॉ. सुजय विखे पाटील

गुन्हेगारांना कोणतीही मुभा नाही; आरोपीचे अतिक्रमित घर हटवणार, मंदिर परिसरासाठी नवे धोरण : डॉ. सुजय विखे पाटील
गुन्हेगारांना कोणतीही मुभा नाही; आरोपीचे अतिक्रमित घर हटवणार, मंदिर परिसरासाठी नवे धोरण : डॉ. सुजय विखे पाटील
Shirdi vijay kapse दि २८ जुलै २०२६–शिर्डीत अलीकडे घडलेल्या खून प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्था अधिक कडक करण्याबरोबरच साई मंदिर परिसरातील अनधिकृत व्यवसाय व अतिक्रमणांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असल्याची माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

खून प्रकरणातील आरोपी राहत असलेल्या अतिक्रमित घराला नोटीस बजावण्यात आली असून, आठवडाभरात अतिक्रमण स्वखर्चाने हटवले नाही तर नगरपंचायतीमार्फत जेसीबीच्या साहाय्याने ते हटविण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
डॉ. विखे पाटील म्हणाले, शिर्डीत घडलेली हत्या अत्यंत दुर्दैवी असून गुन्हेगारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही. कायद्यापुढे सर्व समान आहेत आणि नियमानुसार प्रत्येकावर कारवाई होईल. अतिक्रमणासंदर्भात आरोपीला नोटीस देण्यात आली असून, मुदतीत कारवाई न झाल्यास प्रशासन स्वतः अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया राबवेल.

मंदिर परिसरातील अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी स्वतंत्र हॉकर झोन विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. साई मंदिराच्या चारही बाजूंच्या परिसरात कोणत्याही प्रकारची विक्री करण्यास परवानगी दिली जाणार नसून, पथविक्रेत्यांसाठी स्वतंत्र जागा निश्चित केली जाईल. कोण व्यवसाय करू शकतो, कोणत्या ठिकाणी व्यवसाय करता येईल आणि कोणत्या वस्तूंची विक्री करता येईल, याबाबतची नियमावली ग्रामस्थ, व्यापारी आणि संबंधित घटकांच्या सहभागातून तयार करण्यात येणार आहे.

भाविकांची फसवणूक करणारे, जादा दर आकारणारे किंवा अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये केवळ विक्रेत्यावरच नव्हे, तर संबंधित दुकानमालक आणि जागामालकावरही गुन्हे दाखल करण्यात येतील. गरीब विक्रेत्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, तर त्यामागील मूळ सूत्रधारांवरही कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
साई मंदिर परिसरातील फुले, प्रसाद, शाल व इतर पूजासाहित्याच्या विक्रीबाबत श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट यांनी स्पष्ट धोरण जाहीर करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणत्या वस्तूंना परवानगी असेल आणि कोणत्या वस्तू मंदिरात स्वीकारल्या जातील, याबाबत ठोस निर्णय झाल्यास भाविकांची लूट व अनधिकृत विक्रीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल, असे ते म्हणाले.
पथविक्रेत्यांसाठीची अंतिम नियमावली येत्या आठवडाभरात ग्रामस्थांच्या बैठकीनंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वारंवार व्यवसाय बंद-चालू करण्याऐवजी सर्वांना न्याय देणारा आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी शिर्डी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक करत खून प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्यात पोलिसांना यश आल्याचे नमूद केले. शिर्डीत गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना कोणतीही मुभा दिली जाणार नाही. भाविकांची सुरक्षितता, शहरातील शिस्त आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व कठोर निर्णय राबविले जातील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.




