गोदावरी ओव्हरफ्लोच्या पाण्याने कोपरगाव मतदारसंघातील बंधारे भरावेत; आ. विवेक कोल्हे यांची मागणी
गोदावरी ओव्हरफ्लोच्या पाण्याने कोपरगाव मतदारसंघातील बंधारे भरावेत; आ. विवेक कोल्हे यांची मागणी
गोदावरी ओव्हरफ्लोच्या पाण्याने कोपरगाव मतदारसंघातील बंधारे भरावेत; आ. विवेक कोल्हे यांची मागणी

Kopargaon vijay kapse दि २८ जुलै २०२६: चालू खरीप हंगामात कोपरगाव मतदारसंघात अद्यापही अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकरी व नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीतून सोडण्यात येणाऱ्या ओव्हरफ्लोच्या पाण्याचा उपयोग करून कोपरगाव मतदारसंघातील गावतळी, पाझरतलाव, साठवण बंधारे आणि मातीचे बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संबंधित जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आमदार कोल्हे यांनी निवेदनात म्हटले आहे की, नाशिक, त्र्यंबकेश्वर, घोटी आणि इगतपुरी परिसरात समाधानकारक पर्जन्यमान झाल्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा सुमारे ६५ टक्क्यांच्या जवळ पोहोचला असून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अशा परिस्थितीत गोदावरीच्या उजव्या व डाव्या कालव्यांमध्ये ओव्हरफ्लोचे पाणी सोडून त्याद्वारे कोपरगाव मतदारसंघातील जलसाठे भरावेत, अशी शेतकरी व नागरिकांची मागणी असल्याचे त्यांनी नमूद केले.

अहिल्यानगर-नाशिक आणि मराठवाडा या प्रादेशिक पाणीवाटपाच्या वादात मेंढेगिरी समितीने जायकवाडी धरणासाठी ६५ टक्के पाणीसाठ्याची अट घातली होती. त्यानंतर नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या मांदाडे समितीने ही अट शिथिल केल्याचा उल्लेखही त्यांनी निवेदनात केला आहे.
कोपरगाव मतदारसंघात अद्याप पुरेसा पाऊस न झाल्यामुळे बहुतांश विहिरींमधील पाण्याची पातळी खालावली आहे. गोदावरीच्या ओव्हरफ्लोचे पाणी कालव्यांमार्फत फिरल्यास भूजलपातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना, पशुधनाला तसेच नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. विशेषतः मतदारसंघाच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यासोबतच गोदावरीच्या ओव्हरफ्लोच्या पाण्याबरोबरच पालखेड कालव्याच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगावच्या पूर्व भागातील कोळ नदीवरील सर्व बंधारेही भरून द्यावेत, अशी मागणी आमदार विवेक कोल्हे यांनी शासन व जलसंपदा विभागाकडे केली आहे.




