आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश; ‘कृषी समृद्धी’ योजनेसाठी राज्यात २,००० कोटींची तरतूद
आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश; ‘कृषी समृद्धी’ योजनेसाठी राज्यात २,००० कोटींची तरतूद
आ. विवेक कोल्हे यांच्या पाठपुराव्याला यश; ‘कृषी समृद्धी’ योजनेसाठी राज्यात २,००० कोटींची तरतूद
Kopargaon vijay kapse दि २८ जुलै २०२६: राज्यातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या ‘कृषी समृद्धी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात तब्बल २,००० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे आमदार विवेक कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला मोठे यश मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

आ. विवेक कोल्हे यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय (दत्तामामा) भरणे यांचे आभार मानले आहेत.
पोखरा योजनेत अहिल्यानगरसह अनेक जिल्हे आवश्यक निकष पूर्ण करत असूनही त्यांचा समावेश झाला नसल्याने, उर्वरित जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनाही कृषी समृद्धी योजनेचा लाभ मिळावा, यासाठी आ. कोल्हे यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी शासनाने उर्वरित जिल्ह्यांना या योजनेचा लाभ देण्याची भूमिका स्पष्ट केली होती. मात्र, निधी उपलब्ध नसल्यामुळे अंमलबजावणी रखडली होती.

यानंतर आ. कोल्हे यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देऊन कृषी समृद्धी योजनेस तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी, उत्पादनवाढ, कृषी पायाभूत सुविधा आणि शाश्वत शेती विकासासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले होते. शासन निर्णय झाल्यानंतरही निधी न मिळाल्याने संबंधित विभागाला तातडीने आदेश देण्याची विनंतीही त्यांनी केली होती.
या पाठपुराव्याची दखल घेत राज्य शासनाने कृषी समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी २,००० कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जारी केले आहेत.

या निधीमध्ये सूक्ष्म सिंचनासाठी २६० कोटी, कृषी यांत्रिकीकरणासाठी ९९८ कोटी, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी २० कोटी, रुंद सरी-वरंबा यंत्रासाठी १०० कोटी, वैयक्तिक शेततळ्यांसाठी १०० कोटी, शेतकरी सुविधा केंद्रांसाठी २०० कोटी, ‘आपले गाव-आपले खत (खेत बचाव अभियान)’ यासाठी २५० कोटी तसेच कृषी विद्यापीठे, संशोधन व महत्त्वपूर्ण गुंतवणुकीसाठी ७२ कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
या निधीमुळे राज्यातील शेती अधिक आधुनिक, उत्पादक आणि शाश्वत करण्यास मोठी चालना मिळणार आहे. सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, संशोधन, शेतकरी सुविधा केंद्रे आणि खत बचत अभियान अधिक प्रभावीपणे राबविता येणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणारे आ. विवेक कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळे हा विषय शासनाच्या प्राधान्यक्रमावर आला असून, राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या निर्णयामुळे कृषी क्षेत्राला नवे बळ मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.




