संजीवनी विद्यापीठाचा लिंक्डइन लर्निंगसोबत सामंजस्य करार

संजीवनी विद्यापीठाचा लिंक्डइन लर्निंगसोबत सामंजस्य करार
विद्यार्थ्यांना १५ हजारांहून अधिक जागतिक दर्जाच्या ऑनलाइन अभ्यासक्रमांचा लाभ
Kopargaon vijay kapse दि ३ ऑगस्ट २०२६: विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य, उद्योगाभिमुख ज्ञान आणि रोजगारक्षमतेसाठी आवश्यक आधुनिक कौशल्यांनी सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संजीवनी विद्यापीठाने जगातील अग्रगण्य व्यावसायिक शिक्षण व्यासपीठ लिंक्डइन लर्निंगसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.

या सहकार्यामुळे संजीवनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना १५ हजारांहून अधिक ऑनलाइन अभ्यासक्रम उपलब्ध होणार असून, कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, सायबर सिक्युरिटी, डिजिटल मार्केटिंग, बिझनेस अॅनालिटिक्स, नेतृत्व विकास, संवाद कौशल्य, प्रकल्प व्यवस्थापन, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, फायनान्स, उद्योजकता यांसह अनेक उदयोन्मुख क्षेत्रांतील जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच उद्योग क्षेत्रात मान्यता असलेली प्रमाणपत्रे आणि प्रभावी व्यावसायिक प्रोफाइल तयार करण्याची संधीही विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
संजीवनी विद्यापीठात आयोजित सामंजस्य करार सोहळ्यास प्रेसिडेंट अमित कोल्हे, रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे, ऑनलाइन एज्युकेशन अँड डिस्टन्स लर्निंग स्कूलचे डीन डॉ. विनोद मालकर, स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या डीन डॉ. कविथा राणी उपस्थित होते. तर लिंक्डइन लर्निंगतर्फे अमित मुखजी, शिवप्रसाद लोंगानी आणि अनूप मेनन यांनी सहभाग नोंदविला.

या सामंजस्य करारामुळे शैक्षणिक अभ्यासक्रम आणि उद्योग क्षेत्राच्या अपेक्षा यांतील दरी कमी होण्यास मदत होणार आहे. विद्यार्थी जागतिक दर्जाच्या कौशल्यांमध्ये प्राविण्य मिळवून रोजगार बाजारपेठेतील स्पर्धेसाठी अधिक सक्षम होतील.
२०० हून अधिक देशांतील एक अब्जांपेक्षा अधिक सदस्य असलेले लिंक्डइन हे जगातील सर्वात मोठे व्यावसायिक नेटवर्किंग व्यासपीठ आहे. या माध्यमातून विद्यार्थी स्वतःची व्यावसायिक ओळख निर्माण करू शकतात, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधू शकतात, रोजगाराच्या संधी शोधू शकतात आणि स्वतःची कौशल्ये प्रभावीपणे सादर करू शकतात.

याशिवाय मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅमेझॉन, आयबीएम, अॅक्सेन्चर, डेलॉइट, इन्फोसिस, टीसीएस आणि मेटा यांसारख्या जागतिक आघाडीच्या कंपन्या लिंक्डइन लर्निंगच्या प्रमाणपत्रांना मान्यता देत असल्याने विद्यार्थ्यांचा बायोडेटा अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून त्यांच्या रोजगारक्षमतेतही मोठी वाढ होणार आहे.
भविष्यातील कौशल्यांसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम
“लिंक्डइन लर्निंगसोबतचे हे सहकार्य विद्यार्थ्यांसाठी वर्गखोल्यांपलीकडे जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणारे ठरेल. भविष्यातील कौशल्यांनी परिपूर्ण, उद्योगाभिमुख आणि जागतिक दृष्टीकोन असलेले पदवीधर घडविण्याच्या संजीवनी विद्यापीठाच्या ध्येयाला या उपक्रमामुळे अधिक बळ मिळेल. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून आजीवन शिक्षणाची संस्कृती रुजविण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे. अमित कोल्हे
कार्यक्रमाच्या शेवटी संजीवनी विद्यापीठ आणि लिंक्डइन लर्निंगच्या प्रतिनिधींमध्ये सामंजस्य कराराची अधिकृत देवाणघेवाण करण्यात आली.



