स्वतःची ओळख आणि कठोर परिश्रम हाच यशाचा खरा मंत्र – एन. बी. धुमाळ

स्वतःची ओळख आणि कठोर परिश्रम हाच यशाचा खरा मंत्र – एन. बी. धुमाळ
स्वतःची ओळख आणि कठोर परिश्रम हाच यशाचा खरा मंत्र – एन. बी. धुमाळ
Kopargaon vijay kapse दि ३ ऑगस्ट २०२६ : “यश हे नशिबाने नव्हे, तर स्पष्ट ध्येय, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा, शिस्त आणि वेळेचे योग्य नियोजन यांमधून प्राप्त होते. स्वतःची ओळख करून घेत आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्टता साधण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते,” असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक व प्रेरणादायी वक्ते एन. बी. धुमाळ यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स महाविद्यालय, कोपरगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ निमित्त उद्योजकता विकास कक्ष, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उद्योजकता विकास कक्षाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. माधव सरोदे यांनी विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची वृत्ती विकसित होणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना स्वावलंबनाची प्रेरणा मिळून उद्योगाभिमुख दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले. महाविद्यालयातील उद्योजकता विकास कक्ष विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी आणि रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी डॉ. उज्वला भोर यांच्यासह कला व वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत प्रा. दिलीप भोये यांनी केले. सूत्रसंचालन कु. प्रतीक्षा संवत्सरकर व कु. मयुरी देवकर यांनी केले, तर आभार कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ यांनी मानले.



