अनधिकृत बांधकामाविरोधातील आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित

अनधिकृत बांधकामाविरोधातील आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित
अनधिकृत बांधकामाविरोधातील आमरण उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित

Kopargaon vijay kapse दि १३ ऑगस्ट २०२६: नगरपरिषद हद्दीतील सीटी सर्व्हे क्र. २१०१ मधील ‘आरशी कॉम्प्लेक्स’ या कथित अनधिकृत बांधकामावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार अब्दुल हफीज इस्माईल शेख यांनी गुरुवारी (१३ ऑगस्ट) नगरपरिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू केलेले आमरण उपोषण प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित केले.

शेख यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रार करून संबंधित बांधकामावर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम, १९६६ अंतर्गत नियमानुसार अंतिम कारवाई करावी, तसेच या प्रकरणातील जबाबदार अधिकारी व संबंधित व्यक्तींवरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली होती.

नगरपरिषद प्रशासनाने दिलेल्या लेखी पत्रात संबंधित बांधकामासंदर्भातील यापूर्वीची कार्यवाही व उपलब्ध कागदपत्रांचा सविस्तर आढावा घेऊन नियमानुसार पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. अधिनियमातील तरतुदींनुसार प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून ३० दिवसांच्या आत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने नमूद केले तसेच संबंधित इमारतीचे मालक व विद्यमान मालमत्ता धारकांना १९ ऑगस्ट २०२६ रोजी नोटीस बजावण्यात येणार असून, सर्व संबंधित पक्ष व नगरपरिषद प्रशासनाची ३० ऑगस्टपूर्वी संयुक्त बैठक घेऊन पुढील निर्णय व कायदेशीर प्रक्रिया निश्चित करण्यात येईल, असेही लेखी आश्वासन देण्यात आले.
या आश्वासनानंतर अब्दुल हफीज शेख यांनी आमरण उपोषण स्थगित केले. नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते ज्यूस स्वीकारून, मुख्याधिकारी अजित निकत यांच्या उपस्थितीत उपोषणाची सांगता करण्यात आली.



