सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी निधी द्या

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी निधी द्या
आ. आशुतोष काळे यांची कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे मागणी
Kopargaon vijay kapse दि २१ ऑगस्ट २०२६ : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव रेल्वे स्थानकावर भाविकांच्या वाढत्या गर्दीचा विचार करून आवश्यक मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी नाशिक येथे आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर लेखी निवेदन सादर केले.

कोपरगावला ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभला असून शिर्डी येथील श्री साईबाबा देवस्थान जवळ असल्याने देशभरातून दररोज मोठ्या संख्येने भाविक कोपरगावमार्गे ये-जा करतात. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत दररोज सुमारे दीड लाखांहून अधिक भाविक कोपरगाव रेल्वे स्थानकाचा वापर करण्याची शक्यता असल्याने स्थानकावरील उपलब्ध सुविधांवर मोठा ताण येणार आहे. त्यामुळे कुंभमेळ्यापूर्वीच आवश्यक विकासकामे पूर्ण करणे गरजेचे असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

स्थानकावरील पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी २.५० लाख लिटर क्षमतेची आरसीसी पाण्याची टाकी, २ लाख लिटर क्षमतेची भूमिगत टाकी, स्वतंत्र पंपरूम, दोन बोअरवेल्स, आवश्यक ठिकाणी पाइपलाइन तसेच जुन्या विहिरींचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी करण्यात आली आहे. याशिवाय १५ केएलडी क्षमतेचा घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि अत्याधुनिक जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठीही निधीची आवश्यकता असल्याचे आ. काळे यांनी सांगितले.

स्थानकाच्या सुशोभीकरणासह वातानुकूलित व स्लीपर क्लास प्रतीक्षालयातील फरशा बदलणे, प्लॅटफॉर्म क्रमांक १, २ आणि ३ वर अतिरिक्त सशुल्क स्वच्छतागृहांची निर्मिती करणे, प्लॅटफॉर्मवर पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करणे, स्थानकाच्या इमारतींचे रंगकाम, फॉल्स सीलिंग व नवीन फरशीकाम करणे, अशी विविध कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरुस्ती व नूतनीकरण, १० खाटांची स्वतंत्र निरीक्षण इमारत, तसेच २४ तास पिण्याच्या पाण्याची सुविधा असलेले पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र वॉर्ड उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात कोपरगाव रेल्वे स्थानक हे भाविकांसाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरणार असल्याने, भाविकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुविधायुक्त प्रवासाचा अनुभव मिळण्यासाठी या विकासकामांना प्राधान्याने निधी मिळणे आवश्यक आहे, असे आ. आशुतोष काळे यांनी स्पष्ट केले.
आ. आशुतोष काळे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत कुंभमेळा नियोजनाच्या माध्यमातून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी दिल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली.



