ज्ञान, तंत्रज्ञान, चिंतन व ध्येयाची सांगड घातल्यास यश निश्चित

ज्ञान, तंत्रज्ञान, चिंतन व ध्येयाची सांगड घातल्यास यश निश्चित
जिल्हा न्यायाधीश अॅड. डी. डी. आलमले; एस.एस.जी.एम. महाविद्यालयात कायदा जाणीव जागृती कार्यशाळा
Kopargaon vijay kapse दि २१ ऑगस्ट २०२६ : विद्यार्थ्यांनी जीवनात निश्चित ध्येय ठेवून त्यासाठी ज्ञान, तंत्रज्ञान आणि चिंतनाची योग्य सांगड घालावी. युवाशक्ती ही राष्ट्राच्या प्रगतीची प्रमुख शक्ती असून, या शक्तीला योग्य दिशा व मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश अॅड. डी. डी. आलमले यांनी केले.

रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम. महाविद्यालयात १२ ऑगस्ट रोजी जागतिक युवा दिनानिमित्त तालुका विधी सेवा समिती, वकील संघ, अंतर्गत तक्रार निवारण समिती, महिला मंच व ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कायदा जाणीव जागृती’ कार्यशाळेत ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते.

यावेळी अॅड. डी. सी. लासुरे यांनी कायद्याचे ज्ञान व शिक्षण ही आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले. अॅड. एम. पी. बिहारे यांनी ज्ञान, तंत्रज्ञान, वेळेचा सदुपयोग आणि संयम या गुणांचा युवा पिढीने अंगीकार केल्यास सामाजिक स्वास्थ्य व प्रगती साध्य होईल, असे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना योग्य दिशा, कायद्याचे ज्ञान आणि संस्कार मिळावेत यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे सांगितले. त्यामध्ये ‘कायदा जाणीव जागृती कार्यशाळा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेचे प्रास्ताविक व अतिथी परिचय अंतर्गत तक्रार निवारण समिती व महिला मंचच्या चेअरमन प्रा. (डॉ.) उज्ज्वला भोर यांनी केले. यावेळी सरकारी वकील अॅड. ए. एल. वहाडणे व अॅड. ए. डी. टुपके यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेस महाविद्यालयातील प्राध्यापक तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. मयुरी देवकर व प्रा. अनिता गोरे यांनी केले. आभार डॉ. सीमा दाभाडे यांनी मानले.




