श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या ३२६ व्या जयंतीनिमित्त कोपरगावात अभिवादन

श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या ३२६ व्या जयंतीनिमित्त कोपरगावात अभिवादन
पराक्रम, शौर्य आणि नेतृत्वाची प्रेरणा आजच्या पिढीने घ्यावी; ब्राह्मण सभा कोपरगावचा उपक्रम
Kopargaon vijay kapse दि २२ ऑगस्ट २०२६ : थोरले श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या ३२६व्या जयंतीनिमित्त ब्राह्मण सभा, कोपरगाव यांच्या वतीने श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

अवघ्या ४० वर्षांच्या अल्पायुष्यात आपल्या अद्वितीय युद्धकौशल्य, धाडसी नेतृत्व आणि असामान्य पराक्रमाच्या बळावर मराठा साम्राज्याचा विस्तार उत्तर भारतापर्यंत करणाऱ्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कार्याचे यावेळी स्मरण करण्यात आले. त्यांच्या रणनितीने आणि पराक्रमाने मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णअध्याय निर्माण केला. त्यांचे शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि नेतृत्व आजच्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.

कोपरगावचे नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक, नगरसेवक विक्रमादित्य सातभाई, ब्राह्मण सभा कोपरगावचे अध्यक्ष मकरंद कोऱ्हाळकर , सचिव सचिन महाजन यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्याला व राष्ट्रनिष्ठेला अभिवादन करत त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला. इतिहासातील महापुरुषांचे पराक्रम केवळ स्मरणात न ठेवता त्यांच्या विचारांतून आणि कर्तृत्वातून प्रेरणा घेऊन राष्ट्रहितासाठी कार्य करण्याची गरज आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाच्या माध्यमातून ब्राह्मण सभा, कोपरगावच्या वतीने ऐतिहासिक वारसा, महापुरुषांचे कार्य आणि त्यांच्या प्रेरणादायी विचारांची जपणूक करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. उपस्थित समाजबांधवांनी एकजुटीने श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या स्मृतींना अभिवादन केले.



