अहिल्यानगरमध्ये ७८ उद्योगांची १३ हजार कोटींची गुंतवणूक- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगरमध्ये ७८ उद्योगांची १३ हजार कोटींची गुंतवणूक- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
औद्योगिक क्षेत्राला नवा आत्मविश्वास; रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar vijay kapse दि २२ ऑगस्ट २०२६ : अहिल्यानगर जिल्ह्यात ७८ उद्योजकांनी सुमारे १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी केलेले करार औद्योगिक क्षेत्राला नवा आत्मविश्वास देणारे आहेत. जिल्ह्यात निर्माण झालेल्या सकारात्मक वातावरणामुळे उद्योजक निर्भयपणे गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करतील, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

शासनाच्या उद्योग विभागाच्या वतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील ७८ उद्योगांशी करार करण्यात आले. या माध्यमातून सुमारे १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, या सर्व उद्योजकांचा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

यावेळी उद्योजकांशी संवाद साधताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, अहिल्यानगर जिल्हा आता प्रमुख औद्योगिक केंद्र म्हणून पुढे येत आहे. यापूर्वी औद्योगिक विकासाच्या दृष्टीने काही प्रमाणात नकारात्मक वातावरण होते. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असून, त्याचा लाभ अहिल्यानगर जिल्ह्याला होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रासाठी सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे समाधान आहे.
औद्योगिक विकासासाठी जिल्ह्यात जागांची उपलब्धता करून दिल्यानंतर निबे ग्रुपच्या माध्यमातून पहिला संरक्षण उत्पादन प्रकल्प सुरू झाला आहे. भविष्यात बेलवंडी व हरेगाव येथेही संरक्षण उत्पादनाचे प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी अशा प्रकारचे प्रयत्न जिल्ह्यात झाले नसल्याने औद्योगिक विकासात जिल्हा मागे राहिला. धाक-दडपशाहीमुळे काही उद्योग जिल्ह्यातून माघारी गेल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.
उद्योजकांना सुरक्षित वातावरण, आवश्यक पायाभूत सुविधा आणि कामगारांना संरक्षण मिळेल, असे वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी उद्योग विभागाने घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. सूक्ष्म व लघु उद्योगांपासून मोठ्या उद्योगांपर्यंत गुंतवणुकीसाठी युवक आणि महिला पुढे येत असल्याचे समाधान व्यक्त करताना, गुंतवणुकीची रक्कम किती कोटींची आहे यापेक्षा तरुण उद्योजकांनी दाखविलेल्या धाडसाला अधिक महत्त्व असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
अहिल्यानगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या मोठ्या औद्योगिक पट्ट्यांना जोडणारे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. रस्ते विकासाची कामे तसेच शिर्डी विमानतळाचा विस्तार होत असून, भविष्यात येथे कार्गो हब उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यात सेमीकंडक्टर प्रकल्प आणण्यासाठीही प्रयत्न सुरू असून, जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उजनी प्रकल्पावर डेटा सेंटर उभारण्यात येणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. राज्य सरकारकडून सुमारे ९४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी आमदार काशिनाथ दाते, उद्योग विभागाच्या सहआयुक्त वृषाली सोनी, उद्योजक अरविंद पारगावकर, महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे क्षेत्रीय अधिकारी गणेश राठोड, जिल्हा उद्योग अधिकारी अशोक बेनके, अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेंद्र हिंगे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, शहराध्यक्ष अनिल मोहिते, विनायक देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.



