छात्रों की गुंज कार्यक्रमासाठी संगमनेरमधून २ हजार विद्यार्थिनी पुण्यात

छात्रों की गुंज कार्यक्रमासाठी संगमनेरमधून २ हजार विद्यार्थिनी पुण्यात
डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग

Sangmner vijay kapse दि २२ ऑगस्ट २०२६ : काँग्रेस पक्षाचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे पुणे येथे राज्यातील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून, ‘छात्रों की गुंज’ या कार्यक्रमासाठी संगमनेर शहर व तालुक्यातून तब्बल २ हजार विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य तथा माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली या विद्यार्थिनी पुण्याकडे रवाना झाल्या.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथून विद्यार्थिनींचे पथक पुण्याकडे रवाना झाले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘विद्यार्थी एकतेचा विजय असो’, ‘वंदे मातरम्’, ‘भारत माता की जय’, ‘छात्रों की गुंज, सरकार को सुननी पडेगी’, ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
खासदार राहुल गांधी हे ‘छात्रों की गुंज’ या उपक्रमाच्या माध्यमातून देशभरातील युवकांशी संवाद साधत असून, विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेत त्या सरकारसमोर मांडत आहेत. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे डॉ. जयश्रीताई थोरात यांनी सांगितले.

दरम्यान, पुण्यात या कार्यक्रमासाठी सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या घटनेचा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र निषेध केला. त्यांनी ससून रुग्णालयात जाऊन जखमी विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी माजी मंत्री विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सतेज पाटील, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह काँग्रेसचे विविध नेते उपस्थित होते.
या घटनेचा युवक काँग्रेस नेत्या डॉ. जयश्रीताई थोरात यांनीही निषेध केला. “विद्यार्थ्यांचा आवाज सरकार दाबू शकत नाही. विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यांचा आवाज ऐकावा लागेल,” असे त्यांनी म्हटले.
पुणे येथील एआयएसएसएमएस शैक्षणिक संस्थेच्या मैदानावर सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. संगमनेरमधून २ हजार विद्यार्थिनी सहभागी होत असल्याने या कार्यक्रमात संगमनेरचा आवाज घुमणार आहे. खासदार राहुल गांधी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी विद्यार्थिनींना डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या माध्यमातून मिळणार असल्याने विद्यार्थिनींमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घ्या, आवाज दडपवू नका : डॉ. जयश्री थोरात
शिष्यवृत्तीचा प्रश्न मांडणाऱ्या पुणे येथील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेला लाठीहल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न काय आहेत, ते समजून घ्या; त्यांचा आवाज दडपवू नका. ही ‘झेन झी’ पिढी आहे, तिचे म्हणणे समजून घ्यावे लागेल. खासदार राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांमधील उत्साह आणि आत्मविश्वास पाहता पुणे येथील हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी होईल, असा विश्वास डॉ. जयश्री थोरात यांनी व्यक्त केला. सरकारने विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले.



