नितीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
नितीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर
संजीवनी युनिव्हर्सिटीमध्ये रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; मानवसेवेचा दिला संदेश

Kopargaon vijay kapse दि १८ सप्टेंबर २०२६ : संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त संजीवनी युनिव्हर्सिटी आणि रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच मानवसेवेचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिराचे उद्घाटन संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट श्री. अमित कोल्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी व्हाईस चान्सलर डॉ. ए. जी. ठाकूर, रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रलचे अध्यक्ष विक्रम लोढा, संजीवनी ब्लड बँकेच्या संचालिका नीता पाटील, संजीवनी शैक्षणिक संकुलातील विविध संस्थांचे संचालक, प्राचार्य, डीन, विभागप्रमुख तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री. अमित कोल्हे यांनी रक्तदात्यांची आस्थेने चौकशी करून त्यांच्या समाजाप्रती असलेल्या परोपकारी भावनेचे कौतुक केले. “रक्तदान हेच जीवनदान” या भावनेतून विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले.
अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया, प्रसूती, थॅलेसेमिया, कर्करोग तसेच विविध गंभीर आजारांवरील उपचारांसाठी रक्ताची सातत्याने गरज भासत असते. रक्ताची कृत्रिम निर्मिती करता येत नसल्याने रक्तदानाला विशेष महत्त्व आहे. एका रक्तदात्यामुळे गरजू रुग्णाच्या उपचारासाठी मोलाची मदत उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे रक्तदान हा मानवतेच्या सेवेला वाहिलेला महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रम असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
रक्तदानाच्या माध्यमातून समाजात परस्पर सहकार्य, संवेदनशीलता आणि मानवतेची भावना अधिक दृढ होते, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. श्री. नितीनदादा कोल्हे यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमाने साजरा केल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे कौतुक केले तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संजीवनी युनिव्हर्सिटी, रोटरी क्लब ऑफ कोपरगाव सेंट्रल तसेच विद्यार्थी विकास कक्षाचे डायरेक्टर प्रा. चैतन्य काळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. गणेश फोपसे, प्रा. सुप्रिया भागवत आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.




