आपला जिल्हा

संगमनेरात २८ सप्टेंबरला बालकुमार साहित्य संमेलन

संगमनेरात २८ सप्टेंबरला बालकुमार साहित्य संमेलन

शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची नांदी — दुर्गा तांबे

Sangmner vijay kapse दि २३ सप्टेंबर २०२६ : मातृभाषेविषयी निष्ठा वृद्धिंगत करणे, वाचन संस्कृतीला चालना देणे, मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करणे तसेच विद्यार्थी व पालकांमध्ये साहित्याविषयी सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने संगमनेर येथे सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून आगामी काळात संगमनेरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याच्या प्रयत्नांना दिशा मिळणार असून, हे संमेलन त्याची नांदी ठरेल, अशी माहिती स्वागताध्यक्ष दुर्गा तांबे यांनी दिली.

जाहिरात

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, शाखा संगमनेर, समर्थ युवा फाउंडेशन आणि मराठी भाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

जाहिरात

सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध वक्ते व साहित्यिक डॉ. संजय कळमकर राहणार असून, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक डॉ. स्वाती महाळंक यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. राज्याचे माजी शिक्षण व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रसाद मिरासदार, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा संगमनेरचे कार्यवाह डॉ. नितीन संगमनेरकर आणि शारदा शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुवर्णा मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

जाहिरात

संमेलनात ज्ञान, रंजन आणि प्रबोधनपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. संजय कळमकर यांचे प्रभावी व्याख्यान होणार आहे.  संगीता पुंडगे यांचा मनोरंजनात्मक ‘बोलक्या बाहुल्या’ हा कार्यक्रम, तर प्रसिद्ध गायक त्यागराज खाडीलकर व दीपिका जोग यांचा ‘अक्षर गाणी’ हा प्रबोधनपर कार्यक्रम सादर होणार आहे. शालेय पाठ्यपुस्तकातील संगीतमय कवितांचे गायन प्रकाश पारखे व विद्यार्थी करणार आहेत. कार्यक्रमाचे निवेदन संदीप वाकचौरे करणार असून ध्वनी संयोजनाची जबाबदारी संतोष गोटस्कर यांच्यावर आहे.

संमेलनाच्या निमित्ताने राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक व लेखक योगेश सोमण यांचा ‘ज्योती’ हा लघुपट तसेच मराठी भाषा संचालनालयाचा माहितीपट दाखविण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, शाखा संगमनेर ही संस्था सन २०१० पासून साहित्य, संस्कार, संस्कृती, ज्ञान आणि कला विषयक विविध उपक्रम राबवत आहे. संस्थेचे संस्थापक डॉ. संजय मालपाणी यांचे या उपक्रमांना सातत्याने सहकार्य लाभत आहे. संस्थेचे अध्यक्ष अनिल देशपांडे यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेरला बालकुमार साहित्य संमेलनाचा बहुमान मिळाला आहे.

आगामी २०२७ मध्ये पुणे येथे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे १०० वे साहित्य संमेलन होणार आहे. त्यानंतरचे १०१ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन २०२८ मध्ये संगमनेर येथे व्हावे, यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे  दुर्गा तांबे यांनी यावेळी सांगितले. या संमेलनात संगमनेर शहरासह ग्रामीण भागातील विविध शाळांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, पालक तसेच पत्रकार बांधव सहभागी होणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि मराठी भाषेबद्दल आत्मीयता वाढविणे हा संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष अनिल देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. विवेक वाकचौरे, कार्याध्यक्ष अरविंद गाडेकर, सचिव दर्शन जोशी, कोषाध्यक्ष अरुण तिळे, सहसचिव चारुदत्त काटकर तसेच सदस्य शशांक गंधे, प्रकाश पारखे, अनिल सोमणी आणि ओंकार बिहाणी प्रयत्नशील आहेत.

जाहिरात

या एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनास संगमनेर शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वागताध्यक्ष  दुर्गा तांबे यांनी केले.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे