खासदारांना स्वीडन कुठे आहे हेही माहिती नाही; दोन वर्षांत जिल्ह्यासाठी एक रुपयाचाही निधी आणता आला नाही

खासदारांना स्वीडन कुठे आहे हेही माहिती नाही; दोन वर्षांत जिल्ह्यासाठी एक रुपयाचाही निधी आणता आला नाही
कौटुंबिक वादाचे राजकारण करणे जिल्ह्यासाठी धोकादायक : डॉ. सुजय विखे पाटील
Ahilyanagar vijay kapse दि २६ सप्टेंबर २०२६ : खासदारांचे काही ठरलेले डायलॉग आहेत. त्यांना स्वीडन कुठे आहे, हेही माहिती नाही. त्यामुळे त्यांनी या विषयावर भाष्य करू नये, असा टोला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी लगावला.

जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नावर बोलताना डॉ. विखे म्हणाले की, मागील दोन वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी आणता आला नाही. जिल्ह्यासाठी ठोस काम करता आले नाही. त्यामुळे दुसऱ्यांच्या कौटुंबिक वादात किंवा कौटुंबिक संवादात पडून त्याचे राजकारण करणे, ही विचारसरणीच जिल्ह्यासाठी धोकादायक आहे.
राजकीय व्यक्तीचे राजकीय आणि व्यक्तिगत असे दोन वेगळे आयुष्य असते. राजकीय आयुष्यात पक्ष असतात, पक्षाच्या भूमिका असतात आणि आरोप-प्रत्यारोपही होत असतात. मात्र, व्यक्तिगत आयुष्याची एक मर्यादा असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही वर्षांत खासदारांवर विविध आरोप झाले. महिलांशी संबंधित आरोप झाले, कॉल रेकॉर्डिंगही समोर आली. मात्र, आपण कधीही या मुद्द्यांचा राजकीय फायदा घेऊन भाष्य केले नाही, असे सांगत डॉ. विखे म्हणाले, “माझी एकही बाईट दाखवा, ज्यामध्ये मी खासदारांच्या व्यक्तिगत आयुष्यावर किंवा चारित्र्यावर भाष्य केले आहे.”
व्यक्तिगत आयुष्यात कोणाच्याही जाणे योग्य नाही, हा सुसंस्कृतपणा महाराष्ट्रातील प्रत्येक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी जपला आहे. तोच सुसंस्कृतपणा जपण्याचा आपण प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.

समाजाच्या आणि जिल्ह्याच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी ज्यांच्याकडे मुद्दे नाहीत, ते दुसऱ्यांच्या कौटुंबिक विषयांना राजकीय मुद्दा बनवत असतील, तर त्यावर जनतेने नक्कीच विचार केला पाहिजे, असे आवाहन डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.



