लालफितीचा कारभार नको; मागेल त्याला टँकर द्या – आमदार सत्यजित तांबे

पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन करा — आमदार तांबे
प्रत्येक विभागाने नागरिकांच्या कामांना प्राधान्य द्यावे – आमदार सत्यजित तांबे
टंचाई आढावा बैठकीत जनतेचे प्रश्न सोडवण्यावर भर

संगमनेर येथील प्रांताधिकारी कार्यालयात सर्व शासकीय विभागांची टंचाई आढावा बैठक आमदार सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी रामहरी कातोरे, शंकर पा. खेमनर, अविनाश सोनवणे, विलास कवडे, नवनाथ अरगडे, रमेश नेहे, मीराताई शेटे, दत्तात्रय कोकणे, विजय राहणे, अमोल शेलकर, निखिल पापडेजा, अमोल गुंजाळ, प्रांताधिकारी अरुण मुंडे, तहसीलदार धीरज मांजरे, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, महावितरणचे कार्यकारी अभियंता सोनवणे यांच्यासह तालुक्यातील विविध गावांचे तलाठी, ग्रामसेवक आणि सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने संगमनेर तालुक्याचा समावेश टंचाईग्रस्त परिस्थितीच्या यादीत झाला आहे. यंदाचा दुष्काळ अत्यंत भयावह असून त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. मागणी करणाऱ्यांना टँकर उपलब्ध करून देताना कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये. स्थानिक परिस्थितीचा विचार करून अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घ्यावेत. पिण्याचे पाणी, जनावरांसाठी पाणी आणि चारा यांचे योग्य नियोजन करावे, तसेच पाण्याचे स्रोत व जलसाठ्यांची काळजी घ्यावी.


तालुक्यात विजेचा प्रश्न सातत्याने भेडसावत असून, यावर उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन प्रश्न मार्गी लावावेत. महावितरणने शेतकऱ्यांना सौर कृषिपंप तातडीने मंजूर करून द्यावेत आणि त्यातील जाचक त्रुटी दूर कराव्यात. तसेच पिण्याच्या पाण्याच्या ज्या योजना ९५ टक्के पूर्ण झाल्या आहेत, त्यांना आवश्यक निधी उपलब्ध करून त्या तातडीने पूर्ण कराव्यात, असे निर्देशही आमदार तांबे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
गावातील हेवेदावे बाजूला ठेवून समन्वयाने काम करा
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपला तालुका हा सुसंस्कृत तालुका म्हणून ओळखला जातो. यावर्षी 1972 पेक्षाही अत्यंत अवघड दुष्काळ आहे. दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वांनी एकत्रितपणे काम करा. गावातील हेवेदावे बाजूला ठेवून ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पिण्याचे पाणी, वीज आणि चारा टंचाईच्या प्रश्नांवर समन्वयाने उपाययोजना कराव्यात. दुष्काळाच्या संकटात कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता नागरिकांना दिलासा देण्यास प्राधान्य द्यावे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी त्यांनी गावनिहाय प्रश्नांचा आढावा घेतला.



