सह्याद्री विद्यालयात वाचलेल्या पुस्तकांवर विद्यार्थ्यांचे कथन वाचन दिनानिमित्त अभिनव उपक्रम

सह्याद्री विद्यालयात वाचलेल्या पुस्तकांवर विद्यार्थ्यांचे कथन वाचन दिनानिमित्त अभिनव उपक्रम
विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकावर कथन करणे हा अभिनव उपक्रम–मा.आ.डॉ तांबे
वाचनाने शहाणपण येते– मा. आ. डॉ. सुधीर तांबे
Kopargaon vijay kapse दि १५ ऑक्टोबर २०२६—सोशल मीडियाच्या युगामध्ये विद्यार्थी आणि युवक वाचनापासून दूर जात आहे. वाचन हा जीवनभराचा अनमोल ठेवा असून त्यामधूनच माणसाला खरे शहाणपण येत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने दररोज वाचनाची सवय जोपासली पाहिजे असे प्रतिपादन सह्याद्री संस्थेचे अध्यक्ष मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले आहे. याचबरोबर वाचलेल्या पुस्तकांवर विद्यार्थ्यांनी केलेल्या कथन करणे हा अभिनव उपक्रम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात सभागृहात सह्याद्री विद्यालय व ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकांचे कथन या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ लेखक प्रा विठ्ठल शेवाळे, नानासाहेब खर्डे, डॉ. सागर गोपाळे, डॉ विकास करंजेकर,साहित्यिक व लेखक प्रा. संदीप वाकचौरे, मुख्याध्यापक एस एम खेमनर, उप मुख्याध्यापक श्रीमती सुरेखा राहणे, प्रा.नामदेव कहांडळ , पर्यवेक्षक अण्णासाहेब दिघे, मीणानाथ जोर्वेकर,मिलिंद आवटी, समन्वयक तुषार गायकर, उज्वला घुले, आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी याकरता सह्याद्री विद्यालयातील ग्रंथपाल तुषार गायकर यांनी विविध वाचन गट तयार केले आहेत. दररोज विद्यार्थ्यांना ग्रंथालय मध्ये नेऊन वेगवेगळ्या पुस्तकांबाबत ते मार्गदर्शन करतात. वाचन दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी वाचन केलेल्या पुस्तकांवर कथाकथन करण्याचा अभिनव उपक्रम त्यांनी राबवला. यामध्ये जानवी टांगळ हिने महान वैज्ञानिक गुणाकार मुळे, दिया गायकवाड हिने एका कल्पक जगाचा विचार, वैष्णवी आहेर हिने पळती झाडे, अर्जुन रेवगडे याने चार्ल्स डार्विन, दिशा म्हस्कुले हिने आयटी विश्वातील अनभिशिक्त सम्राट, रोहिणी उगले हिने श्यामची आई, मानसी आरोटे हिने डॉ आयडा स्कडर या पुस्तकांवर कथाकथन केले.

यावेळी बोलताना मा आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले की, भारतरत्न डॉ अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने पुस्तकावर कथाकथन करण्याचा हा अत्यंत अभिनव उपक्रमातून यामधून वाचन चळवळीला चालना मिळणार आहे. डॉ.अब्दुल कलाम हे विचारवंत, शास्त्रज्ञ ,लेखक ,कवी होते, लहानमुलांप्रती त्यांना प्रचंड प्रेम होते. अग्निपंख हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना हे पुस्तक घरात ठेवण्यासाठी आग्रहच केला पाहिजे त्यातून नक्कीच प्रेरणा मिळणार आहे.
वाचाल तर वाचाल हे अत्यंत बरोबर आहे कारण वाचनाने शहाणपण येते. सध्या सोशल मीडिया दूरदर्शन असे वेगवेगळे माध्यमे आहेत परंतु सकाळी काय झाले ते संध्याकाळी माणूस विसरून जातो पण जे लोक वाचतात ते आयुष्यभर ते भांडवल जगतात खऱ्या अर्थाने वाचनाने शहाणपण येत असते. विद्यार्थ्यांनी छोट्या छोट्या गोष्टींचे पुस्तके, विज्ञानवादी यांचे वाचन करावे. वाचनाने भविष्यात तुम्हाला सगळ्यात मोठी समृद्धी मिळणार असल्याचे ते म्हणाले.
तर प्रा विठ्ठल शेवाळे म्हणाले की, सह्याद्री विद्यालयाने विद्यार्थ्यांमध्ये वाचन आवडण्यास विविध उपक्रम सुरू केले असून हे अत्यंत दिशादर्शक आहे.तर तुषार गायकर म्हणाले की सह्याद्री विद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये हजारो पुस्तके असून अनेक लहान मुले विद्यार्थी शिक्षक पुस्तक वाचत असतात पुस्तकांची आदान प्रदान करतात आम्ही वाचन गट केले असून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये त्या पुस्तकाविषयी मांडण्याची उत्सुकता निर्माण होते. यावेळी संदीप वाकचौरे म्हणाले की, वाचक कमी होत असताना विद्यार्थ्यांमध्ये वाचण्याची आवड निर्माण करण्याचा सह्याद्री विद्यालयाचा उपक्रम स्तुत्य आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक एस एम खेमनर यांनी केले, सूत्रसंचालन तुषार गायकर यांनी केले तर श्रीमती सुरेखा राहणे यांनी आभार मानले. यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



