यशोधन कार्यालयाला वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

यशोधन कार्यालयाला वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट
यशोधन कार्यालयाला वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट
Sangmner vijay kapse दि १६ ऑक्टोबर २०२६ : सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, संगमनेर येथील वाणिज्य विभागाच्या प्रथम वर्षाच्या ४३ विद्यार्थ्यांनी गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाला शैक्षणिक भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना कार्यालयीन कामकाज, प्रशासकीय व्यवस्था, कागदपत्रांचे व्यवस्थापन, लोकसंपर्क तसेच दैनंदिन कामकाजातील समन्वय यांची प्रत्यक्ष माहिती घेण्याची संधी मिळाली.

विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न राहता प्रत्यक्ष कार्यपद्धतीची ओळख व्हावी आणि कार्यालयीन व्यवस्थापन व प्रशासकीय कामकाजाचे व्यावहारिक ज्ञान मिळावे, या उद्देशाने या शैक्षणिक भेटीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यालयातील विविध विभागांच्या कामकाजाची माहिती घेताना विद्यार्थ्यांनी नियोजन, समन्वय, जबाबदारीचे वाटप, कागदपत्रांचे व्यवस्थापन तसेच नागरिकांच्या प्रश्नांबाबत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घेतली. या भेटीमुळे अभ्यासक्रमातील विविध संकल्पना प्रत्यक्ष व्यवहाराशी जोडण्यास विद्यार्थ्यांना मदत झाली. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना भविष्यातील व्यावसायिक व प्रशासकीय क्षेत्रातील वाटचालीसाठी आवश्यक कौशल्ये आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अशा शैक्षणिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

प्रत्यक्ष कार्यालयीन व्यवस्थेचे निरीक्षण केल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडण्याबरोबरच कार्यालयीन कार्यपद्धती, लोकसंपर्क आणि प्रशासकीय समन्वय याबाबत त्यांना महत्त्वपूर्ण अनुभव मिळाला. या शैक्षणिक भेटीचे समन्वयक म्हणून प्रा. गणेश थोरात यांनी काम पाहिले. कार्यालयीन समन्वयासाठी यशोधन कार्यालयाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन भांड, समन्वयक ईश्वर फापाळे, जनसंपर्क अधिकारी नामदेव कहांडळ आणि रवींद्र सोनवणे यांनी सहकार्य केले.

या उपक्रमास वाणिज्य विभागप्रमुख प्रो. डॉ. विजय बैरागी, आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. लक्ष्मण घायवट तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. बाळासाहेब वाघ यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभवातून व्यावहारिक ज्ञान मिळावे आणि त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन विकसित व्हावा, या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना कार्यालयीन कामकाजाची प्रत्यक्ष ओळख झाली.
यशोधन कार्यालय म्हणजे सर्वसामान्यांच्या कामांचे ‘मंत्रालय’!
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची विविध कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातात. नागरिकांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्या प्रश्नांचा पाठपुरावा करणे, शासकीय योजनांची माहिती देणे आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, अशा विविध स्वरूपाचे काम या कार्यालयातून केले जाते.
त्यामुळे यशोधन कार्यालयाचे कामकाज हे एखाद्या मंत्रालयाप्रमाणेच व्यापक स्वरूपाचे असल्याचे विद्यार्थ्यांना या भेटीतून जाणवले. जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, योग्य मार्गदर्शन करणे आणि संबंधित यंत्रणेशी समन्वय साधणे, हे या कार्यालयाच्या कामकाजाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक भेटीतून केवळ प्रशासकीय कामकाजाची माहिती घेतली नाही, तर लोकसंपर्क, जनसेवा आणि कार्यालयीन समन्वयाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची कामे कशा पद्धतीने केली जातात, याचीही प्रत्यक्ष अनुभूती घेतली.



