‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी कोपरगावात तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानासाठी कोपरगावात तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा
प्रभावी संवादकौशल्य, विभागीय समन्वय आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांवर मार्गदर्शन
Kopargaon vijay kapse दि १८ ऑक्टोबर २०२६: ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाची गावपातळीवर प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने पंचायत समिती कोपरगाव येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि. १६ ऑक्टोबर) तालुकास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

गटविकास अधिकारी श्री. स्वप्निल वाळुंज आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यशाळेत मुंबई येथील आरोग्य भवनचे कार्यकारी अधिकारी डॉ. अक्षय राऊतवाड यांनी विशेष प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणादरम्यान प्रभावी संवादकौशल्य, द्विमार्गी संवाद, आंतरविभागीय समन्वय, लोकसहभाग, क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या जबाबदाऱ्या तसेच त्यांच्याकडून शासनाच्या असलेल्या अपेक्षा याविषयी प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांशी सकारात्मक संवाद साधून आरोग्यविषयक जनजागृती वाढविणे आणि शासनाच्या आरोग्यसेवा तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान यशस्वी करण्यासाठी आरोग्य, शिक्षण, महिला व बालविकास आणि पंचायत राज विभागांनी परस्पर समन्वय राखून सामूहिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गावपातळीवर नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवून आरोग्यविषयक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहनही करण्यात आले. या कार्यशाळेस तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि आशा गटप्रवर्तक उपस्थित होते. कार्यशाळेचे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कोपरगाव यांच्या वतीने करण्यात आले.




