आपला जिल्हा

कवी अनंत फंदी नाट्यगृहाची तिसरी घंटा लवकरच वाजणार

कवी अनंत फंदी नाट्यगृहाची तिसरी घंटा लवकरच वाजणार

आमदार सत्यजित तांबे यांच्याकडून अंतिम टप्प्यातील कामाची पाहणी; लवकरच नाट्यगृह रसिकांच्या सेवेत

Sangmner vijay kapse दि २६ ऑक्टोबर २०२६ : संगमनेरच्या समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक आणि नाट्यपरंपरेला आधुनिकतेची नवी जोड देणारे, कवी अनंत फंदी यांच्या नावाने साकारण्यात येत असलेले एक हजार आसनक्षमतेचे अद्ययावत बंदिस्त नाट्यगृह आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी नाट्यगृहाच्या सुरू असलेल्या अंतिम कामाची पाहणी करून संबंधित अधिकारी व यंत्रणेला आवश्यक सूचना दिल्या. उर्वरित काम वेगाने पूर्ण करून हे नाट्यगृह लवकरच रसिकांच्या सेवेत खुले होणार असल्याने संगमनेरमधील नाट्यप्रेमी आणि कलारसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ. दुर्गाताई तांबे यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह बंदिस्त करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुवात झाली. या प्रकल्पासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा करत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे नाट्यगृहाचे काम आता पूर्णत्वाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे.

पाहणीप्रसंगी अजय फटांगरे, वास्तुविशारद अरविंद वैद्य, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे, अभियंता पंकज मुंगसे यांच्यासह शहरातील विविध पदाधिकारी, अधिकारी व संबंधित यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जाहिरात

संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा

संगमनेरला कवी अनंत फंदी यांच्यापासून शाहीर विठ्ठल उमप, पद्मश्री रघुवीर खेडकर, कांताबाई सातारकर यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांची समृद्ध परंपरा लाभली आहे. साहित्य, लोककला, नाटक, संगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रात संगमनेरच्या अनेक कलाकारांनी राज्यासह देशपातळीवर आपला ठसा उमटविला आहे.

या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी शहरात आधुनिक आणि दर्जेदार सांस्कृतिक सुविधा असणे गरजेचे होते. त्याच दृष्टीने कवी अनंत फंदी नाट्यगृहाचा विकास हा संगमनेरच्या सांस्कृतिक वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

जाहिरात

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दुर्गा तांबे यांच्या पुढाकारातून नगरपालिकेने नाट्यगृहाच्या बंदिस्तीकरणाचा प्रस्ताव पुढे आणला. आमदार सत्यजित तांबे यांनी राज्यातील विविध आधुनिक नाट्यगृहांची पाहणी करून तेथील आवश्यक सुविधा संगमनेरच्या नाट्यगृहात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले.

कलाकारांना हक्काचे व्यासपीठ; रसिकांना दर्जेदार कलानुभव

नाट्यगृहाच्या उभारणीच्या प्रक्रियेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष व प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनीही भेट देऊन मार्गदर्शन केले आहे. विविध तज्ज्ञांच्या सूचना आणि आधुनिक नाट्यगृहांच्या गरजा लक्षात घेऊन हे नाट्यगृह अधिक दर्जेदार व सुविधायुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

नाटक, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने तसेच विविध कलाविष्कारांसाठी हे नाट्यगृह उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे संगमनेर व परिसरातील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे आणि दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांनाही उत्तम वातावरणात नाट्यप्रयोग व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.

उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी आमदार निधीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका घेतली आहे. एक हजार आसनक्षमता असलेले हे नाट्यगृह तालुका स्तरावरील आधुनिक सांस्कृतिक सुविधांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

नाट्यगृहाचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर येत्या काही दिवसांत ते रसिकांसाठी खुले होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे संगमनेरच्या सांस्कृतिक क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात होणार असून, कलावंत आणि रसिक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्या नाट्यगृहाची ‘तिसरी घंटा’ लवकरच घुमणार आहे.

तालुकास्तरावरील अद्ययावत नाट्यगृह ठरणार!
– आमदार सत्यजित तांबे

“संगमनेरने राज्याला आणि देशाला अनेक नामवंत कलावंत दिले आहेत. या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे. कवी अनंत फंदी यांच्या नावाने उभारण्यात येत असलेले एक हजार आसनक्षमतेचे बंदिस्त नाट्यगृह या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आधुनिक सुविधा आणि प्रेक्षकांच्या सोयी लक्षात घेऊन साकारले जाणारे हे नाट्यगृह तालुका स्तरावर विशेष महत्त्वाचे ठरेल. काम अंतिम टप्प्यात आले असून, उर्वरित कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत ते लवकरात लवकर रसिकांच्या सेवेत दाखल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या नाट्यगृहामुळे स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळेल आणि संगमनेरच्या सांस्कृतिक परंपरेला नवी ऊर्जा मिळेल.”

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे