राष्ट्रीय विजेत्या संजीवनीच्या ब्रास बँडचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर दिमाखदार सादरीकरण

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; संजीवनी युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये थेट प्रक्षेपणाला नागरिकांची मोठी उपस्थिती

दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेत देशात प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर या पथकाला थेट पंतप्रधानांच्या उपस्थितीत सादरीकरणासाठी निमंत्रित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत, शिस्त आणि गुणवत्तेच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर यश मिळवत थेट देशाच्या पंतप्रधानांसमोर सादरीकरण करण्याचा बहुमान मिळवणे, ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब ठरली आहे.

या ऐतिहासिक क्षणाचा आनंद संजीवनी परिवारासह परिसरातील नागरिकांना अनुभवता यावा, यासाठी संजीवनी युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये या कार्यक्रमाचे मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण करण्यात आले. या कार्यक्रमासाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा साईबाबा संस्थानचे माजी उपाध्यक्ष माननीय श्री. बिपिनदादा कोल्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी परिसरातील नागरिक, विद्यार्थी, पालक आणि संजीवनी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक क्षणाचा आनंदोत्सव साजरा केला.

विशेष म्हणजे, यंदाच्या राष्ट्रीय शालेय बँड स्पर्धेसाठी तयारी करणाऱ्या संजीवनी रुरल एज्युकेशन सोसायटी संचलित एकलव्य आदिवासी अनुदानित आश्रमशाळा, टाकळी येथील विद्यार्थ्यांनीही याप्रसंगी आपल्या ब्रास बँड पथकाचे बहारदार सादरीकरण केले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बिपिनदादा कोल्हे म्हणाले की, समाजातील सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देत त्यांना राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवर चमकण्याची संधी मिळावी, हे स्वर्गीय कै. शंकररावजी कोल्हे साहेबांचे स्वप्न होते. संजीवनीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश म्हणजे त्या स्वप्नाची प्रत्यक्ष पूर्तता होत असल्याचे समाधान आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना योग्य संधी, सक्षम मार्गदर्शन आणि शिस्तीची जोड मिळाली, तर ते देशाच्या सर्वोच्च व्यासपीठावरही आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकतात, याचे संजीवनीच्या ब्रास बँड पथकाने घालून दिलेले उदाहरण निश्चितच प्रेरणादायी आहे!



