सह्याद्रीच्या कुशीत रंगणार पर्यावरण संवर्धनाचा जागर

सह्याद्रीच्या कुशीत रंगणार पर्यावरण संवर्धनाचा जागर
१४ व १५ नोव्हेंबरला भंडारदऱ्यात दहावे राज्यस्तरीय पर्यावरण संमेलन;पद्मश्री राहिबाई पोपेरे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती
Akole vijay kapse दि ४ नोव्हेंबर २०२६ : निसर्गाचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणविषयक जनजागृतीचा संदेश समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ, महाराष्ट्र राज्य आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने १४ व १५ नोव्हेंबर २०२६ रोजी इकोसिटी (घाटघर) भंडारदरा अकोले येथे १० व्या राज्यस्तरीय पर्यावरण संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी आणि निसर्ग संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी या संमेलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन
या संमेलनाला ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण डॉ. अण्णासाहेब हजारे यांचे मार्गदर्शनाखाली होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री राहिबाई पोपेरे राहणार असून, उद्घाटनप्रसंगी लिज्जत पापडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय विशेष कार्य अधिकारी मंत्रालय मुंबई श्री चंद्रकांत आडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी श्री चंद्रकांत शिंदे, पुणे महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता नामदेव गिंभिरे, कळसूबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार आणि सी.एस.आर. प्रमुख संतोष जगधने यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
शनिवार, १४ नोव्हेंबर रोजी सकाळी निसर्गभ्रमंती व नाथा कार्यक्रमाने संमेलनाची सुरुवात होईल. त्यानंतर पर्यावरण संमेलनाचे उद्घाटन, भोजन आणि विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.

पुणे येथील डी.वाय. पाटील विद्यापीठाचे प्रा. डॉ. मोहन बी. वामन हे वनस्पती वर्गीकरणशास्त्र, लोकवनस्पतिशास्त्र आणि जैवविविधता संवर्धन या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. ज्येष्ठ बांबू अभ्यासक, संशोधक व लेखक राजेंद्र कुलकर्णी हे बांबू व गवत प्रजातींचा अभ्यास, संशोधन आणि संवर्धन याविषयी विचार मांडणार आहेत. पर्यावरण व शाश्वत विकासातील विविध पैलूंवरही या संमेलनात चर्चा होणार आहे. सायंकाळी पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा आढावा, आदिवासी, कातकरी समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १५ नोव्हेंबर रोजी योग व प्राणायाम रानकवी तुकाराम धांडे यांच्या मार्गदर्शनाखाली समारोपाचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय घाटघर, सांदणदरी, अमृतेश्वर मंदिर, विविध धबधबे, भंडारदरा धरण आणि रंधा फॉल यांसारख्या परिसरातील निसर्गरम्य स्थळांना भेट देण्याची संधीही उपलब्ध होणार आहे.

निसर्ग वाचविण्यासाठी एकत्र येण्याची वेळ
आज वाढते प्रदूषण, जंगलतोड, पाण्याचे दुर्भिक्ष्य, प्लास्टिकचा वाढता वापर आणि जैवविविधतेचा ऱ्हास ही मानवजातीसमोरील गंभीर आव्हाने आहेत. या संकटांवर मात करण्यासाठी केवळ शासनाच्या प्रयत्नांवर अवलंबून न राहता प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे.
पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था, निसर्गप्रेमी, युवक-युवती, शिक्षक, विद्यार्थी, शेतकरी, संशोधक आणि वन्यजीवप्रेमी यांच्यासाठी हे संमेलन विचारांची देवाणघेवाण, अनुभवांची मांडणी आणि नव्या पर्यावरणपूरक उपक्रमांची प्रेरणा घेण्याचे व्यासपीठ ठरणार आहे.
“निसर्गाचे रक्षण हीच भविष्याच्या पिढ्यांना दिलेली सर्वांत मौल्यवान भेट!” हा संदेश मनात ठेवून पर्यावरण संवर्धनासाठी कटिबद्ध असलेल्या प्रत्येकाने या संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे अध्यक्ष प्रमोद मोरे कार्याध्यक्ष महेश पाडेकर , श्रीमती छायाताई राजपूत जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब डोंगरे श्री सतिश नेहे, उपाध्यक्ष श्री रामनाथ भोजने, राज्य संघटक अमोल चंदनशिवे आणि संमेलन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




