कोपरगावच्या वंदना चिकटे व ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांना शिर्डीत राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव

कोपरगावच्या वंदना चिकटे व ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांना शिर्डीत राज्यस्तरीय पुरस्काराने गौरव
वंदना चिकटे यांना ‘माऊली नवदुर्गा पुरस्कार’, तर ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई यांना ‘माऊली साहित्य कला अकादमी पुरस्कार’ प्रदान
Kopargaon vijay kapse दि ७ नोव्हेंबर २०२६ : शिर्डी येथे माऊली हेल्प फाउंडेशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात कोपरगाव येथील दोन कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. वंदना जगमोहन चिकटे यांना विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘माऊली नवदुर्गा पुरस्कार २०२६’, तर शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या अध्यक्षा सौ. ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘माऊली साहित्य कला अकादमी पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

वंदना जगमोहन चिकटे यांनी कला, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच लघुउद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रांत त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या अध्यक्षा ऐश्वर्यालक्ष्मी संजय सातभाई यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना ‘माऊली साहित्य कला अकादमी पुरस्कार २०२६’ देऊन सन्मानित करण्यात आले. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव करण्यात आला.

मुख्यमंत्री कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी डॉ मंजुषा कुलकर्णी यांच्या हस्ते दोन्ही पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी माऊली हेल्प फाउंडेशनचे अध्यक्ष सुरेश मुळे, कार्याध्यक्षा सरला शेष, सचिव प्रा. ज्ञानेश्वरी मुळे, सतीश वैजापूरकर, मकरंद कोऱ्हाळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कोपरगावच्या दोन महिलांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, या सन्मानामुळे कोपरगावच्या नावलौकिकात भर पडली आहे.






