आत्मा मालिक ध्यानपीठाच्या स्वागत कमानीचे आ.विवेक कोल्हे व संत महंतांच्या उपस्थितीत लोकार्पण

आत्मा मालिक ध्यानपीठाच्या स्वागत कमानीचे आ.विवेक कोल्हे व संत महंतांच्या उपस्थितीत लोकार्पण
आत्मा मालिक ध्यानपीठाच्या स्वागत कमानीचे आ.विवेक कोल्हे व संत महंतांच्या उपस्थितीत लोकार्पण
Kopargaon vijay kapse दि २४ नोव्हेंबर २०२६–परमपूज्य सद्गुरू जंगलीदास गुरु माऊली महाराज यांच्या आशीर्वादाने आत्मा मालिक ध्यानपीठाच्या स्वागत कमानीचा लोकार्पण सोहळा परमपूज्य परमानंद महाराज आणि आमदार विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या स्वागत कमानीमुळे आत्मा मालिक ध्यानपीठाच्या आध्यात्मिक वैभवात आणखी भर पडणार असून परिसराला एक वेगळी ओळख प्राप्त होणार आहे.

यावेळी आयोजित कार्यक्रमास परमपूज्य आत्मा मालिक सद्गुरू जंगलीदास गुरुमाऊली महाराज, परमपूज्य परमानंद महाराज, परमपूज्य निजानंद महाराज यांची पावन उपस्थिती लाभली.संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यवंशी साहेब, सचिव बाळासाहेब गोरडे, कोषाध्यक्ष होन साहेब, विश्वस्त प्रदीप भंडारी, विश्वस्त प्रकाशजी गिरमे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री. ज्ञानेश्वर बापू परजणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी आप्पा रक्ताटे, संचालक बाळासाहेब वक्ते साहेब, तसेच कारखान्याचे आजी-माजी सर्व संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी कोकमठाण, संवत्सर, सडे, जेऊर व कुंभारी परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.याशिवाय राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यकारी अभियंता शिंदे मॅडम,नाशिक येथील जमले साहेब, उपविभागीय अभियंता सुनील यादव यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार विवेक कोल्हे म्हणाले की, बालपणापासूनच आत्मा मालिक ध्यानपीठाशी आपला जिव्हाळ्याचा संबंध राहिला आहे. येथील आध्यात्मिक चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा नेहमीच प्रेरणा देणारी आहे. ध्यानपीठाच्या माध्यमातून देश-विदेशात आध्यात्मिक विचारांचा प्रसार करून सामाजिक परिवर्तन आणि समाजाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू आहे. आज या ध्यानपीठामुळे कोपरगाव तालुक्याचे नाव जागतिक स्तरावर अभिमानाने घेतले जात आहे.

माजी मंत्री शंकरराव कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे आणि बिपीनदादा कोल्हे यांच्या माध्यमातून कुटुंबाचे ध्यानपीठाशी नेहमीच आत्मीयतेचे संबंध राहिले आहेत. गुरुमाऊलींचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन आयुष्यात अनेकदा प्रेरणादायी ठरले. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीवेळी मिळालेला आशीर्वाद राज्यभर त्यामुळे लोकप्रियता मिळाली. तसेच आमदार होण्यापूर्वीच गुरुमाऊलींनी व्यक्त केलेला विश्वास आजही स्मरणात आहे. स्वागत कमानीची जबाबदारी पूर्ण करून तिचे लोकार्पण होत असल्याचा विशेष आनंद आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ध्यानपीठात येणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी तसेच परिसरातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
परमपूज्य परमानंद महाराज यांनी कोल्हे कुटुंबाचे ध्यानपीठाशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध अधोरेखित केले. ध्यानपीठाच्या विविध उपक्रमांना कोल्हे कुटुंबाने नेहमीच सहकार्य केले आहे. आमदार विवेक कोल्हे यांना मिळालेली लोकसेवेची जबाबदारी त्यांनी राजकारणापलीकडे जाऊन सामाजिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही पार पाडावी, असे आशीर्वचन त्यांनी दिले. या स्वागत कमानीखालून जाणाऱ्या हजारो भाविकांना ‘आत्मा मालिक’ हे नाव वाचून आत्मनामाचे स्मरण होईल आणि त्यातून पुण्यकर्म घडेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
नंदकुमार सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे स्वागत करून आमदार विवेक कोल्हे यांच्या अभ्यासू, दूरदृष्टीपूर्ण आणि कार्यक्षम नेतृत्वाचे कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाला सर्व स्तरांतून मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.या सोहळ्यामुळे आत्मा मालिक ध्यानपीठ आणि कोल्हे कुटुंबातील आध्यात्मिक व सामाजिक स्नेहबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले.



