आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नांना यश; शिंगवे येथे उच्च क्षमतेच्या वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा
आ.आशुतोष काळेंच्या प्रयत्नांना यश; शिंगवे येथे उच्च क्षमतेच्या वीज उपकेंद्राचा मार्ग मोकळा
शेती महामंडळाची ६.५५ हेक्टर जमीन २२०/३३ के.व्ही.
उपकेंद्रासाठी विद्युत पारेषण कंपनीला हस्तांतरित

Kopargaon vijay kapse दि २३ नोव्हेंबर २०२६ :- शिंगवे परिसरातील शेती व घरगुती वीजपुरवठ्यावरील वाढता ताण, कमी दाबाने मिळणारी वीज आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोपरगाव मतदार संघातील राहाता तालुक्यातील शिंगवे येथील शेती महामंडळाच्या गट क्रमांक २८७ व २८४ मधील ६.५५ हेक्टर जमीन २२०/३३ के.व्ही. उपकेंद्र उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यामुळे शिंगवे येथे उच्च क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून शिंगवे व पंचक्रोशीतील अनेक गावांच्या परिसरातील वीज समस्या कायमस्वरूपी दूर होण्यात मोठी मदत होणार आहे.

शिंगवे येथे २२०/३३ के.व्ही. उपकेंद्र उभारण्यासाठी शेती महामंडळाच्या मालकीची जागा महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीला मिळावी अशी मागणी वारंवार होत होती. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी शिंगवे येथे उच्च क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारण्याची मागणी शासनाकडे सातत्याने लावून धरली होती. या मागणीला शासनस्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळून उपकेंद्रासाठी आवश्यक असलेली जमीन विद्युत पारेषण कंपनीला उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्या जमिनीवर २२०/३३ के.व्ही. उपकेंद्र उभारले जाणार असून त्यामुळे वीज वितरण व्यवस्थेला अतिरिक्त क्षमता उपलब्ध होऊन शिगवे व परिसरातील कित्येक गावांचा वीजपुरवठा अधिक सक्षम करण्यास मदत होणार आहे. कमी दाबाची समस्या कमी होणे, वीजपुरवठ्यातील व्यत्यय घटणे, शेतीपंपांना पूर्ण क्षमतेने आवश्यक वीज उपलब्ध होणे तसेच भविष्यातील वाढत्या वीज मागणीला सामावून घेण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महत्वाची असलेली जमिनीची अडचण दूर होवून वीज उपकेंद्रासाठी जमीन उपलब्ध झाल्यामुळे प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला गती मिळणार असून, शिंगवे व परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या वीज समस्या कायमस्वरूपी दूर होणार असल्यामुळे शिंगवे परिसरातील वीज समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याच्या दिशेने झालेल्या या निर्णयाचे शेतकरी व नागरिकांनी स्वागत केले असून आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. या उपकेंद्रासाठी जमीन उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार,उपमुख्यमंत्री ना.एकना शिंदे,महसूलमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.




