हायवे ते मालदाडसह चिंचोली पर्यंतचे रस्त्याचे काम सुरू – आमदार थोरात
७७ कोटींचा मंजूर निधीला सरकारने स्टे दिल्याने कामे रखडली होती.
राजकारण करताना सर्वसामान्य जनतेशी खेळू नये; हायवे ते मालदाड रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन
संगमनेर विजय कापसे दि ९ मार्च २०२४– महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांकरता 77 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र नवीन सरकार आले आणि त्यांनी सर्व विकास कामांना स्थगिती दिली. ही स्थगिती सुप्रीम कोर्टातून उठवली. तालुक्यातील विकास कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न असून हा काळ लवकर संपणार आहे .हायवे ते मालदाड सह चिंचोली गुरव पर्यंतच्या रस्त्याचे काम सुरू झाले असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
मालदाड येथे नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्ग 60 ते मालदाड या 4 किमी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मा.आ.डॉ.सुधीर तांबे हे होते तर समवेत बाबासाहेब डांगे, बी.आर.चकोर, नवनाथ आरगडे, संपतराव गोडगे,गणपतराव सांगळे,रावसाहेब नवले, त्रिंबक गडाख,सुभाष सांगळे,सोमनाथ गोडसे, विलास नवले, सरपंच गोरख नवले,मच्छिंद्र नवले, बाळासाहेब नवले, विपुल नवले, उत्तम नवले, भीमा नवले, शिवनाथ नवले, रामभाऊ नवले आदींसह ग्रामस्थ नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील विविध रस्त्यांच्या कामासाठी 77 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र अचानक सत्तांतर झाले आणि दिलेल्या विकास कामांना या नवीन सरकारने स्थगिती दिली. अशी स्थगिती देण्याची पद्धत कधीही नव्हती. राजकारण करताना सर्वसामान्य जनतेशी खेळू नये मात्र या लोकांची प्रवृत्ती चुकीची असल्याने त्यांनी सर्वसामान्य त्रास दिला. मालदाड रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांना अनेक दिवस त्रास सहन करावा लागला.यासाठी सरपंच गोरख नवले आणि उपोषणही केले. मात्र तालुक्याच्या विकास कामांसह रस्त्याचे कामे होऊ नये याकरता अनेक अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन रस्त्यांना दिलेला स्टे उठवला असून यामुळे कामे सुरू झाली आहेत. त्यामुळे महामार्ग ते मालदाड सह सोनोशी – नान्नज- चिंचोली गुरव याही रस्त्याचे काम सुरू आहे. रस्ते व इतर विकास कामांसाठी खडी लागते. म्हणून मुद्दाम खडी सेंटर बंद केले गेले. संगमनेर तालुक्याचा विकास त्यांना पहावत नाही त्यांचा हेतू चांगला नाही.
संगमनेरच्या राजकारणाची परंपरा सुसंस्कृत आहे. कधीही कोणाला त्रास दिला जात नाही. हेतू चांगला यामुळे चांगलेच होत असून आगामी काळ हा महाविकास आघाडी सरकार आणि संगमनेर तालुक्याचा असेल असेही ते म्हणाले.
तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, सत्तेत असो अथवा नसो आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक गावच्या वाडी विकासासाठी मोठा निधी मिळवला आहे. त्यामुळे संगमनेर तालुका विकासातून वैभवशाली आहे. मात्र सध्याचे राजकारण अत्यंत दुर्दैवी आहे.राजकीय दहशतवाद सर्वत्र सुरू आहे. सत्तेचा गैरवापर केला जात आहे.फोडाफोडी सुरू आहे.सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर ताशेरे ओढले आहेत. लोकशाही धोक्यात आली असून नागरिकांनी सजग राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच गोरक्ष नवले यांनी केले तर उपसरपंच गणेश भालेराव यांनी आभार मानले.यावेळी ग्रामपंचायत च्या महिला सदस्य महिला बचत गटाच्या सर्व महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.