आ.थोरात यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेच्या कर्ज वसुलीमध्ये संगमनेर तालुका प्रथम
कर्ज वसुलीची परंपरा जपताना ८९.७०% इतका वसूल; ४ सोसायटी यांची मेंबर पातळीवर १०० % तर ८१ सोसायट्यांची बँक पातळीवर १०० % वसुली

संगमनेर प्रतिनिधी दि २ जुलै २०२४– काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारातून समृद्धी निर्माण करत विकासाचे मॉडेल ठरलेल्या संगमनेर तालुक्याने याही वर्षी सेवा सोसायट्यांमध्ये आपल्या कर्ज फेडीची परंपरा कायम ठेवत ८९.७०% इतकी वसुली देत जिल्ह्यात प्रथम क्रमांक राखला असल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड.माधवराव कानवडे यांनी दिली आहे.

जिल्हा बँक वसुली बाबत माहिती देताना ॲड कानवडे पुढे म्हणाले की,सहकार हे गोरगरिबांच्या विकासाचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे .सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेर तालुक्याने सहकारातून समृद्धी निर्माण केली असून राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासातून सर्व क्षेत्रात अग्रभागी राहिला आहे . अहमदनगर जिल्हा सहकारी बँक ही जिल्ह्याची आर्थिक कामधेनू असून सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकरी, गोरगरीब यांना बँकेने सातत्याने कर्ज पुरवठा केला आहे.

आ.बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामुळे या बँकेवर जिल्ह्यातील सर्व सभासद, ठेवीदार, शेतकरी यांचा मोठा विश्वास आहे .संगमनेर तालुक्याने आपल्या कर्जफेडीची उज्वल परंपरा कायम ठेवत तालुक्यातील 4 सेवा सोसायटी यांनी मेंबर पातळीवर शंभर टक्के वसुली दिली आहे .यामध्ये घुलेवाडी, म्हसवंडी ,निमगाव टेंभी व निंबाळे या गावांचा समावेश आहे. तर इतर 81 सेवा सोसायटी यांनी बँक पातळीवर शंभर टक्के वसुली दिली आहे .यामुळे तालुक्याची वसुली ही 89.70% राहिली असून अहमदनगर जिल्ह्यातून संगमनेर तालुक्याचा कर्ज वसुलीमध्ये प्रथम क्रमांक मिळाला आहे.

या कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांमध्ये सातत्याने प्रबोधन करताना आमदार बाळासाहेब थोरात व मा.आ डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात व चेअरमन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे, संचालक गणपतराव सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे , तालुका विकास अधिकारी अशोक थोरात, वसुली अधिकारी उल्हास शिंदे, कार्यालयीन अधीक्षक सुखदेव पचपिंड, तालुका सचिव प्रकाश कडलग यांचेसह विविध पदाधिकाऱ्यांनी गावोगावी सातत्याने बैठका घेऊन कर्ज वसुलीसाठी विशेष परिश्रम घेतले आहे.यामुळे तालुक्याची कर्ज वसुली ही 89.70 % इतकी झाली आहे.

या सर्व वसुली कामांमध्ये संगमनेर तालुक्यातील सर्व सेवा सोसायटीचे चेअरमन , व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, सचिव, जिल्हा बँकेचे शाखाधिकारी ,अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .तसेच सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, संगमनेर तालुका दूध संघ, शेतकी संघ, मार्केट कमिटी या संस्थांनी ही कर्जदार शेतकऱ्यांचा वसुली करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे.

जिल्हा बँकेच्या या वसुलीच्या परंपरेबद्दल काँग्रेसचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे,बाजीराव पा.खेमनर, ॲड.माधवराव कानवडे, गणपतराव सांगळे, इंद्रजीत भाऊ थोरात, युवक काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.जयश्रीताई थोरात, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, बाबा ओहोळ, शंकरराव खेमनर, संपतराव डोंगरे , सुधाकर जोशी आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
