रायबा..! हेच का आपले स्वराज्य या महानाट्याने संगमनेरकर भारावले; लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉनचा अनोखा उपक्रम
रायबा..! हेच का आपले स्वराज्य या महानाट्याने संगमनेरकर भारावले; लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉनचा अनोखा उपक्रम
रायबा..! हेच का आपले स्वराज्य या महानाट्याने संगमनेरकर भारावले; लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉनचा अनोखा उपक्रम

संगमनेर विजय कापसे दि १८ ऑगस्ट २०२५ – भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरतर्फे आयोजित स्वातंत्र्योत्सवाचा भव्य सोहळा मालपाणी लॉन्स, लक्ष्मी रोड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यंदाच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले “रायबा..! हेच का आपले स्वराज्य?” या तडाखेबंद महानाट्य. देशभक्तीची ज्वाला प्रज्वलित करणारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना अधोरेखित करणारे हे महानाट्य पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी तर मनात अभिमानाची ज्योत पेटली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक अध्यक्ष गिरीश मालपाणी आणि मा. अध्यक्ष श्रीनिवास भंडारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण केले. महाराजांची आरती करण्यात आली तसेच शहीद भगतसिंग, वीर सावरकर आणि भारतमाता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. संगमनेरचे शहीद संदीप घोडेकर यांच्या पत्नी वर्षा संदीप घोडेकर यांचा ११,००० रुपये रोख, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ए मेरे वतन के लोगो या गाण्याने सर्वांच्या अंगावर शहारे आले. देशासाठी बलिदान देणाऱ्या कुटुंबाचा गौरव केल्याने संपूर्ण परिसरात टाळ्यांचा कडकडाट झाला. याशिवाय ओंकारजी, राजेशजी आणि गोपाजी जोशी यांनी त्यांच्या मातोश्री रमाबाई चुनीलाल जोशी यांचे निधनानंतर नेत्रदान केले होते. या सामाजिक कार्याबद्दल जोशी परिवाराचाही विशेष सन्मान करण्यात आला.

या सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. व्यासपीठावर प्रमुख अतिथी गिरीश मालपाणी, माजी अध्यक्ष श्रीनिवास भंडारी, अध्यक्ष कल्याण कासट, सचिव सुमित मणियार, खजिनदार नामदेव मुळे, तसेच प्रकल्प प्रमुख प्रशांत गुंजाळ आणि सुदीप हासे उपस्थित होते. महानाट्यासाठी मा. मंत्री आ. बाळासाहेब थोरात, मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्रीताई थोरात, ललिताबाई मालपाणी, सुवर्णाकाकी मालपाणी आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.

“रायबा..! हेच का आपले स्वराज्य?” या महानाट्याने प्रेक्षकांना जणू इतिहासाच्या पानांत नेऊन ठेवले. प्रा. प्रकाशकुमार वाघमारे यांच्या संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शनातून साकारलेले हे नाट्य केवळ ऐतिहासिक नव्हते तर त्यात सध्याच्या सामाजिक वास्तवाशी जोडलेले मुद्देही ठळकपणे मांडले गेले. अफजलखान वध, शिवा काशीद प्रसंग, मर्दानी खेळ, दांडपट्टा, लाठीकाठी, भालेबाजी, फटाक्यांची आतषबाजी अशा थरारक प्रसंगांनी उपस्थितांची मने भारावून गेली.

छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका लायन्स सॅफ्रॉनचे सदस्य डॉ. सागर फापाळे यांनी साकारली. त्यांच्या दमदार अभिनयाने संपूर्ण सभागृहात घोषणांचा गजर झाला. त्यांच्या उत्कृष्ट भूमिकेबद्दल त्यांचा सत्कार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीने करण्यात आला. तसेच दिग्दर्शक प्रा. वाघमारे यांचाही गौरव झाला. डॉ. फापाळे यांचे चुलते कारभारी फापाळे व चुलती सुमन फापाळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. प्रतिकूल परिस्थितीतून आपल्या पुतण्याला घडविणाऱ्या चुलत्यांनी समाजात उभे केले, त्यांच्या कष्टांची दखल घेतल्याने वातावरण भारावून गेले. स्थानिक कलाकार सोनम कडलग, पंडित दुधे व दीपक रावळ यांचाही विशेष सत्कार झाला.
या महानाट्यात सामाजिक बांधिलकी, परस्त्रीचा आदर, व्यसनमुक्ती, जातीय सलोखा यांसारख्या विषयांवर प्रभावी संदेश देण्यात आला. ऐतिहासिक प्रसंगांच्या बरोबरीने सामाजिक प्रश्नांचा अनोखा मेळ घालून या नाट्याने तरुणांच्या मनावर गहिरा ठसा उमटवला. पुण्यातील ३५ कलाकार व संगमनेरच्या कलाकारांनी एकत्रितपणे उत्कृष्ट अभिनय सादर करून उपस्थितांना भावनिक केले.
नाट्य संपल्यानंतर “छत्रपती शिवाजी महाराज की जय” घोषणांनी लॉन्स दणाणून गेले. देशभक्तीची ठिणगी प्रज्वलित करणाऱ्या या महानाट्याने प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात “स्वराज्य म्हणजे केवळ सिंहासन नव्हे तर सुराज्याची, सामाजिक न्यायाची आणि एकात्मतेची प्रेरणा” हे अधोरेखित केले.
गेल्या २२ वर्षांपासून लायन्स क्लब संगमनेर सॅफ्रॉन सफायरच्या वतीने स्वातंत्र्योत्सवाच्या निमित्ताने नाटक, व्याख्याने, स्पर्धा अशा विविध उपक्रमांची परंपरा सुरु आहे. या वर्षीच्या कार्यक्रमाने मात्र समाजमनात वेगळाच ठसा उमटवला. “रायबा..! हेच का आपले स्वराज्य?” या प्रश्नातून उपस्थितांना विचारप्रवृत्त करणारे हे नाट्य संगमनेरच्या सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासातील एक संस्मरणीय पर्व ठरले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प प्रमुख प्रशांत गुंजाळ आणि सुदीप हासे यांनी केले. लायन्स सॅफ्रॉन सफायरच्या प्रकल्प समितीने या सोहळ्याच्या यशासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. उत्तम नियोजन आणि समन्वयामुळे कार्यक्रम अत्यंत भव्यदिव्य स्वरूपात पार पडला.




