आपला जिल्हा

लखपती दीदी योजना ; महिलांसाठी स्वावलंबनाचा मार्ग

लखपती दीदी योजना ; महिलांसाठी स्वावलंबनाचा मार्ग

लखपती दीदी योजना ; महिलांसाठी स्वावलंबनाचा मार्ग

कोपरगाव विजय कापसे दि १५ सप्टेंबर २०२४-महिलांचे आर्थिक सक्षमीकरण समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी महिलांना स्वतःचे निर्णय घेण्याचे सामर्थ्य, आर्थिक स्वातंत्र्य, आणि समाजात आदराचे स्थान मिळणे गरजेचे आहे. भारतातील महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी केंद्र सरकारने ‘लखपती दीदी’ योजना सुरू केली आहे. या योजनेतून महिलांना अर्थार्जनाच्या संधी, कौशल्य प्रशिक्षण, आणि उद्योजकतेचा विकास करून आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण केले जाते. राज्यातही या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

जाहिरात

‘लखपती दीदी’ योजनेच्या माध्यमातून महिलांना १ ते ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाते. हे कर्ज व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी वापरले जाऊ शकते. या योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या कर्जामुळे महिलांना आर्थिक अडचणी दूर करण्यास मदत होते, तसेच त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते.

योजनेच्या लाभासाठी पात्रता

या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात. लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवाशी असावी. त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक. महिलेचे वय १८ ते ५० दरम्यान असावे. या योजनेसाठी अर्ज करणारी महिला बचत गटाशी संबंधित असावी, तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

जाहिरात

 

अर्ज कसा करावा

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी महिला बचतगटांना व्यवसाय योजना तयार करावी. व्यवसाय आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट हा आराखडा आणि अर्ज शासनाच्या महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद (महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान) यासारख्या शासकीय यंत्रणेकडे पाठवावा. अर्ज करताना आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र असणे आवश्यक आहे.

महिला अशा होणार लखपती

बचतगटांकडून प्राप्त अर्जांचे या शासकीय यंत्रणेमार्फत पुनरावलोकन केल्यानंतर अर्ज स्वीकारला जाता. ‘लखपती दीदी’ योजनेअंतर्गत महिलांना विविध कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणादरम्यान महिलांना त्यांच्या आवडीनुसार प्लंबिंग, शिलाई, बुटीक, एलईडी बल्ब बनवणे, कापडी पिशव्या निर्मिती, बेकरी उत्पादन, पापड-लोणचे बनवणे आणि ड्रोन ऑपरेशन अशा विविध व्यवसायिक कौशल्यांची माहिती दिली जाते. प्रत्यक्ष प्रशिक्षणानंतर बचगटांना या योजनेअंतर्गत व्यवसायाच्या स्वरूपानुसार १ ते ५ लाख रुपयांचे बिनव्याजी कर्जही दिले जाते.

महिलांना व्यवसायाचे व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, आणि मार्केटिंग यांची माहितीदेखील प्रशिक्षणात दिली जाते. महिलांना व्यवसाय सुरू करताना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो, हे समजून घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. या प्रशिक्षणामुळे महिलांच्या आत्मविश्वासात वाढ होते, तसेच त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतात.

 

जिल्ह्यातील ७९ हजार महिला ‘लखपती दीदी’ बनणार

अहमदनगर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ७९ हजार ३५७ महिला ‘लखपती दीदी’ योजनेच्या लाभासाठी निवडण्यात आल्या आहेत. यात अकोले तालुक्यातून ६ हजार २८, संगमनेर ९ हजार १२६, कोपरगाव ४ हजार ७१४, राहाता ५ हजार ४५२, श्रीरामपूर ४ हजार १३३, नेवासा ४ हजार ६२१, राहूरी ३ हजार १७९, अहमदनगर ९ हजार ४६८, कर्जत ५ हजार २७४, जामखेड ३४९१, पारनेर ५ हजार ६३५, पाथर्डी ७ हजार ८३१, शेवगाव ४२१५ आणि श्रीगोंदा तालुक्यातून ६ हजार १९० महिलांची ‘लखपती दीदी’ म्हणून निवड झाली आहे. लखपती दीदींचे वार्षिक उत्पन्न किमान एक लाखापेक्षा जास्त होण्यासाठी त्यांना दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यवसाय संधी निर्माण करून दिल्या जाणार आहेत. अभियानातील महिलांना बँकेचे व्यवहार शिकविले जातात त्यांना आर्थिक साक्षर केले जाणार आहे.

‘लखपती दीदी’ योजना महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. हे अभियान महिलांना त्यांच्या सामर्थ्याची अनुभूती देते, त्यांच्या स्वप्नांना गती प्रदान करते आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवते. या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे बचत गटातील महिला स्वावलंबी बनून ‘लखपती’ होण्याचे स्वप्न साकार करू शकतील, हे निश्चित.

सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी 

बचत गटातील महिलांना लखपती करण्यासाठी विविध विभागात समन्वय साधला जात आहे. महिलांचे उत्पन्न वाढविण्यावर अधिक भर आहे. कौशल्य, प्रशिक्षण आणि आर्थिक् साक्षरता या त्रिसूत्रीवर लक्ष देण्यात आले आहे. रेशीम शेती, पर्यटनसारख्या अपारंपरिक व्यवसायाकडे महिलांनी वळावे यासाठीदेखील प्रयत्न करण्यात येत आहेत.

आशिष‌ येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

जिल्ह्यात लखपती दीदी मोहीमेतील पहिल्या टप्प्याची नोंदणी पूर्ण झाली आहे. सन २०१९ पासून २८ हजार महिला बचतगटातील ३ लाख महिला उमेद अभियानात सहभागी झाल्या आहेत. यातील पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ७९ हजार महिलांना लखपती दीदी उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. उर्वरित महिलांना टप्प्याटप्प्याने लखपती दीदी मोहीमेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.

संकलन – उप माहिती कार्यालय, शिर्डी

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे