गोदावरी दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली
गोदावरी दूध संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत पार पडली
दुग्ध व्यवसाय अडचणीत असतानाही शासनाचा पाच रुपये अनुदानाचा निर्णय ऐतिहासिक – राजेश परजणे
कोपरगांव विजय कापसे दि. १५ सप्टेंबर २०२४–राज्यातील सहकारी तत्वावरील दुग्ध व्यवसाय अडणीत असतानाही दुग्धविकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूध उत्पादकांना दिलासा देण्यासाठी दुधाला पाच रुपये अनुदानासह ३५ रुपये दर देण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आणि स्वागतार्ह असल्याचे प्रतिपादन गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी केले. राज्यातील खंडकरी व आकारपडीत जमिनी वारसांना मिळवून देण्यासाठी ना. विखे पाटील यांनी दिलेल्या योगदानाबद्दल तर विधानसभेचे माजी अध्यक्ष व भाजपाचे ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी निवड झाल्याबद्दल सभेत अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या कार्यस्थळावर खेळीमेळीत पार पडली. प्रारंभी संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन अहवाल सालात दिवंगत झालेल्या व्यक्तींना आदरांजली वाहण्यात आली. अध्यक्षपदावरुन बोलताना राजेश परजणे पाटील यांनी संघाच्या कामकाजाविषयी व भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषीयीची माहिती दिली. संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील सर्व विषय सविस्तर चर्चेने सर्वानुमते मंजूर करण्यात आलेत.
दुग्ध व्यवसायात अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. शासनाने जाहीर केलेल्या पाच रुपये अनुदान योजनेमुळे आपल्या संघाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. परंतु दूध उत्पादकांच्या भल्यासाठी आम्ही हा तोटा सहन करीत आहोत असे सांगून श्री परजणे पाटील पुढे म्हणाले, उरळीकांचन येथील भारतीय कृषी उद्योग प्रतिष्ठानच्या सहकार्याने गोदावरी दूध संघाने कार्यक्षेत्रामध्ये ३६ केंद्रांमार्फत कृत्रिमरेतन गर्भधारणा उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणावर जातीवंतगाईंची पैदास केली. याशिवाय संघाने भारतात सर्वप्रथम गोदावरीच्या कार्यक्षेत्रात सॉर्टेडसिमेनसारखा उपक्रम राबवून ३० ते ३५ लिटर दूध देणाऱ्या गाईंची पैदास करून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक समृध्दी निर्माण करून दिली. हा कार्यक्रम राबविताना सॉर्टडसिमेनसाठी दूध उत्पादकांना नाममात्र शुल्कात सिमेन उपलब्ध करुन दिलेले आहे. यासाठी संघ दरमहा नऊ लाखाहून अधिक रुपये खर्च करीत आहे. पशुरोग निदान प्रयोगशाळा व पशुसंवादिनी या उपक्रमामार्फत जनावरांच्या आजाराबाबत व त्यावर करावयाच्या उपराचाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येते. पशुरोग निदान प्रयोगशाळेच्या माध्यमातून जनावरांच्या आजाराबाबत काळजी घेण्यात येते. संघामार्फत मुरघास प्रकल्प राबविण्यात येणार असून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जागेवर मुरघास तयार करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (आणंद) यांच्या संयुक्त सहकार्याने संघ कार्यक्षेत्रातील दूध उत्पादकांना बायोगॅस (गोबरगॅस) संयंत्र अनुदान तत्वावर अनेक कुटुंबांना उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. संघाने गांव पातळीवरील प्राथमिक सहकारी दूधसंस्था व सेंटरच्या दूध उत्पादकांना गायी खरेदीकरिता कर्ज उपलब्ध करुन दिलेले आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडले नाही. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहोत.
गोदावरी दूध संघाच्या वार्षिक सभेत सर्व विषय एकमताने मंजूर
संघाचा स्वमालकीचा १.५ मेगावॅट सौरउर्जा प्रकल्प लवकरच कार्यान्वीत होणार असून राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे व ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. विजेचे वाढलेले दर विचारात घेता भविष्यात सौरउर्जा प्रकल्पाचा संघाला चांगला फायदा होणार असल्याचे सांगून संघाचे संस्थापक नामदेवरावजी परजणे आण्णा यांनी संघासाठी आणि दूध उत्पादकांसाठी केलेल्या त्यागाचे स्मरण ठेऊन आमची वाटचाल सुरु आहे. दूध उत्पादकांनी प्रामाणिकपणा, सचोटी आणि चिकाटी ही धोरणे राबविली तरच दुग्ध व्यवसायात यश मिळेल असेही मार्गदर्शन श्री परजणे पाटील यांनी केले.
सभेला संघाचे उपाध्यक्ष गोपीनाथ केदार, संचालक विवेक परजणे, उत्तमराव डांगे, भाऊसाहेब कदम, गोरक्षनाथ शिंदे, नानासाहेब काळवाघे, सुदामराव कोळसे, जगदीप रोहमारे, संजय टुपके, भिकाजी झिंजुर्डे, दिलीप तिरमखे, सौ. सुनंदाताई होन, सौ. सरलाताई चांदर, सौ. सुमनबाई शिंदे तसेच नानासाहेब सिनगर, आंबादास वराडे, संजीवनी कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, उत्तमराव माने, सुभाषराव होन, भाऊसाहेब काळे, बाळासाहेव सोनवणे, संदीप गुडघे, प्रभाकर घाटे, सोमनाथ निरगुडे, विजय परजणे, शिवनाथ खिलारी, अशोकराव काजळे, निवृत्ती नवले, सुदामराव शिंदे, यशवंतराव गव्हाणे, सदाशिव कार्ले, सीताराम कांडेकर, बद्रीनाथ वल्टे, दत्तात्रय शितोळे. शफीलाल सय्यद, बायफ संस्थेचे डॉ. बाळासाहेब जिगळेकर यांच्यासह संघाचे सभासद, दूध संस्थांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकरी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. संचालक विवेक परजणे यांनी आभार व्यक्त केलेत.