संजीवनी कॉलेजच्या ध्रुव व दिक्षाची तलवारबाजीत विभागीय स्पर्धेसाठी निवड
संजीवनीचे जिल्हास्तरीय सपर्धेतील यश
कोपरगांव विजय कापसे दि २० सप्टेंबर २०२४– क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्यामार्फत संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगांव येथे नुकत्याच १९ वर्षे वयोगटांतर्गत जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धांचे आयोजन केले होते. यात संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या ध्रुव विशाल जैन व दिक्षा किशोर सोनवणे यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे, अशी माहिती ज्यु. कॉलेजच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
पत्रकात पुढे म्हटले आहे की संजीवनी ज्यु. कॉलेजचे खेळाडू विविध स्पर्धांमध्ये यश मिळवित आहे. संजीवनी ज्यु. कॉलेजमध्ये शैक्षणिक बाबींबरोबरच खेळ हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविभाज्य भाग आहे, या संकल्पनेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येते. विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या खेळाचे कौशल्ये दडलेली आहे, हे हेरून त्यांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देवुन प्रशिक्षित केल्या जाते, यामुळे संजीवनीचे खेळाडू विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त करीत आहेत.
विभागीय स्पर्धांसाठी पुणे, सोलापुर, पिंपरी चिंचवड व अहमदनगर जिल्ह्यातील स्पर्धक असणार आहे. यातही जिंकायचे या जिध्दीने ध्रुव व दिक्षा अधिकचा सराव क्रीडा प्रशिक्षक प्रा. अक्षय येवले यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी ध्रुव व दिक्षाचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंडगे व प्रशिक्षक प्रा. येवले यांचेही अभिनंदन केले आहे.