योगदान शून्य आमदार काळे यांच्याकडे दूरदृष्टी नाही – सुरेश जाधव
योगदान शून्य आमदार काळे यांच्याकडे दूरदृष्टी नाही – सुरेश जाधव
कोपरगाव विजय कापसे दि १ ऑक्टोबर २०२४– ज्यांना गावात कुणी विचारत नाही स्वतःच्या गावाने ही अनेकदा नाकारले आहे अशांनी आमच्या नेत्यांवर पूर्ण माहिती नसताना बोलणे म्हणजे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाल्यासारखे आहे. कोल्हे कुटुंब हे समाजसेवेचा आणि गोरगरिबांना रोजगाराचा वसा घेऊन पुढे जाते आहे. या तुलनेत काळे कुटुंबाने तालुक्यात रोजगारासाठी काहीही ठोस काम केले नाही हे सर्वांना ठाऊक आहे. स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांनी रोजगार निर्मितीसाठी टाकलेले पाऊल भीतीदायक वाटून अपूर्ण माहितीवर उताऱ्यांची भाषा करणे हे अर्धवटपणाचे लक्षण आहे अशी बोचरी टीका गोरख जामदार यांचे नाव न घेता सुरेश जाधव यांनी केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील स्मार्ट सिटी तालुक्याबाहेर घालवण्याची वाच्यता आमदार काळे यांनी २०१७ सालीच केली होती. त्याच धर्तीवर चांदेकसारे आणि धोत्रे गावातही शेतकऱ्यांचे गट पाडून मनभेद निर्माण करण्यामध्ये काळे गट आघाडीवर होता. स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांनी केलेल्या कामांनाही जनतेसमोर चुकीचे भासवणे म्हणजे आपली पाप झाकण्याचा प्रकार असल्याची जळजळीत टीका जाधव यांनी आमदार आशुतोष काळे व त्यांच्या बगलबच्चांवर केली आहे.
तरुणांना रोजगार चांगल्या आरोग्य सुविधा रस्ते पाणी हे मूलभूत प्रश्न तालुक्यात सुटले नाहीत. पाट पाण्याचा अक्षरशा खेळखंडोबा केला आहे. त्यातच एक नवीन प्रकार समोर येतो असून माझ्याकडे प्रवेश करा मग मी तुमचे काम करतो अशा प्रकारच्या बेगडी प्रवेशांचे आमदार काळे यांचे भिंग फुटले आहे.तालुक्यात एकही काम नाही की कोणताही रस्ता धड राहिला नाही.विकासाचा बोजवारा उडाला असून हजारो कोटींच्या गप्पा ऐकून नागरिक कंटाळले आहे.कोल्हे कुटुंब हे रोजगार देण्यासाठी प्रत्येक गोष्ट करते आहे तसे विरोधकांचे युवकांना रोजगार देण्यासाठी काय योगदान असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
ग्रामीण भागात विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे.शेती पाण्याचे नियोजन कोलमडले आहे.विद्यार्थ्यांना बसेसचे प्रश्न आहेत त्यावर आमदार काळे मौन असून आपले नाकर्तेपणा झाकण्यासाठी प्यादे वापरून कोल्हे कुटुंबावर टीका करण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे.जर आमच्या नेत्यांवर चुकीची टिपण्णी केली तर आम्ही जशाच तसे उत्तर देऊ असा इशारा जाधव यांनी काळे गटाला दिला आहे.
ज्या माणसाने आमच्या नेत्यांवर टीका केली तो ज्या संस्थेचा नामधारी पदाधिकारी आहे त्या संस्थेत बिहारी कर्मचारी भरून स्थानिकांना रोजगारापासून वंचित ठेवले आहे त्यामुळे अशा लोकांना उजळ माथ्याने बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.