संगमनेरकरांचे स्वप्न पूर्ण व्हावे ही माझी इच्छा – खासदार सुप्रिया सुळे
आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सुसंस्कृत नेतृत्वाची राज्याला गरज: सरकारमध्ये आमदार थोरात यांच्यावर मोठी जबाबदारी; साकुर येथे विराट सभा
संगमनेर विजय कापसे दि १८ नोव्हेंबर २०२४– महाविकास आघाडीच्या समन्वयाची कोणतीही जबाबदारी असल्यास ती सोडवण्याची जबाबदारी आमदार बाळासाहेब थोरात अत्यंत चांगल्या पद्धतीने करत असून राज्याचे सुसंस्कृत आणि कर्तबगार नेतृत्व आहे. त्यांच्या नेतृत्वाची राज्याला गरज आहे आणि संगमनेरकरांचे स्वप्न पूर्ण व्हावे ही माझी सुद्धा इच्छा आहे असे सांगताना आमदार थोरात यांना विक्रमी मतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
साकुर येथे आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आमदार बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ.जयश्रीताई थोरात, राजस्थानच्या माजी मंत्री अर्चना शर्मा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर,बाजीराव पाटील खेमनर, इंद्रजीत खेमनर, शिवसेनेचे अमर कातारी, संजय फड, दिलीप साळगट, अशोक सातपुते, सौ.मीराताई शेटे, ॲड अशोक हजारे, सचिन खेमनर, सुधाकर जोशी, जयराम ढेरंगे, सुनंदाताई भागवत आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खासदार सुळे म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात राज्याचे सुसंस्कृत नेतृत्व असून महाविकास आघाडीच्या समन्वयाची जबाबदारी त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळली आहे. कोणताही प्रश्न आला की ते सर्वांना सोबत घेऊन तो प्रश्न सोडवतात. अनेक दिवसाच्या कामातून त्यांनी संगमनेर तालुका उभा केला आहे. हा तालुका विकासाचे मॉडेल ठरला आहे. आता संगमनेरकरांचे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावे ही माझी सुद्धा इच्छा आहे. जयाताई एक आदर्श कन्या असून खंबीर मुलगी आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार असून आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी येणार असल्याचे संकेत त्यांनी दिले.
आमदार थोरात म्हणाले की, पठार भागातील जनतेने आपल्यावर कायम प्रेम केले. तालुका विस्ताराने मोठा असूनही प्रत्येक गावात विकासाच्या योजना आपण राबवल्या. या तालुक्यात चांगले वातावरण आहे चांगली परंपरा आहे. मात्र हे खराब करण्यासाठी काही मंडळी काम करत असून राहता तालुक्यातील दहशतवाद इकडे आणत आहेत. पोलीस प्रशासनाने त्यांचा बंदोबस्त करावा. नाहीतर आम्हाला दुरुस्ती करावी लागेल असेही त्यांनी सांगितले. सरकारचा कोणताही धाक राहिला नसून पालकमंत्री दडपशाहीला प्रोत्साहन देत आहे. हे राज्य सरकार महिलांच्या सुरक्षिततेसह सर्व बाबींवर कुचकामी ठरले आहे. लोकसभेमध्ये राज्यातील जनतेने पंतप्रधान मोदी यांची घमेंड उतरवली असून महाविकास आघाडी सत्तेवर आणण्यासाठी सर्वत्र काम करावे असे आवाहन केले.
तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुका हा परिवार मानला आणि जनतेनेही त्यांच्यावर खूप प्रेम केले 20 तारखेला सर्वाधिक मतदान करून आमदार बाळासाहेब थोरात यांना विजयी करा असे आवाहन केले तर खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की, विकास कामांमध्ये सातत्याने आमदार बाळासाहेब थोरात यांना केंद्राच्या माध्यमातून निधी मिळवण्याकरता आपण मदत करणार आहोत. यावेळी विविध मान्यवरांची भाषणे झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंद्रजीत खेमनर यांनी केले तर शंकर पाटील खेमनर यांनी आभार मानले.
मुळा नदीवर मोरवाडी येथे धरण होणार
मुळा नदी बारामाही जिवंत करण्यासाठी मोरवाडी येथे पिंपळगाव खांड प्रमाणे धरण पूर्ण करण्यासाठी 2019 ला काम हाती घेतले आहे. येणाऱ्या काळामध्ये हे धरण पूर्ण केले जाईल असे सांगताना महायुतीच्या काळात रखडलेल्या पुणे- नाशिक रेल्वे कामालाही गती देण्यात येईल असे आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगतात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला.