मतदारांनी उस्फूर्तपणे मतदान करावे निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांचे आवाहन
मतदारांनी उस्फूर्तपणे मतदान करावे निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांचे आवाहन
कोपरगांव शहरात मतदार जनजागृती फेरी संपन्न.
कोपरगाव विजय कापसे दि १८ नोव्हेंबर २०२४–२१९ कोपरगाव विधानसभा मतदार संघातील निवडणुकीत मतदारांनी उस्फूर्तपणे सहभागी होऊन जास्तीत जास्त मतदान करावे. असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यात सुरु असलेल्या विधानसभा निवडणुक पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या वतीने स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीचे विविध उपक्रम सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने कोपरगाव शहरातील विविध शाळा सामाजिक संस्था यांचा सहभाग घेऊन मतदार जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी सायली सोळंके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत, मुख्याधिकारी तथा प्रशासन सुहास जगताप, गटविकास अधिकारी संतोष राऊत, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, स्वच्छतादूत व पर्यावरण प्रेमी सुशांत घोडके, रोटरी क्लबचे रोहित वाघ,वीरेश अग्रवाल,राकेश काले, गोदामाई प्रतिष्ठानचे आदिनाथ ढाकणे यासह शाळेतील शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून या जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. मतदारांची जागृती करणारे गीत ऐकवणारा रथ, हातामध्ये जनजागृती फलक घेतलेले शालेय विद्यार्थी मतदारांची लक्ष वेधून घेत होते. फेरीची सांगता तहसील कार्यालय प्रांगणात करण्यात आली. येथे महाराष्ट्राची गायिका गौरी पगारे हिने मतदारांना जनजागृती गीत ऐकून जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले. डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी छोटी पथनाटिका सादर केली. तसेच मतदार जागृती चा पोवाडा सादर केला. या प्रसंगी सर्वांना मतदानाविषयी सार्वजनिक शपथ देण्यात आली.
याप्रसंगी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी महेश सावंत यांनी शालेय विद्यार्थ्यांनी आपल्या परिवारातील आपल्या परिसरातील सर्व मतदारांना येथे २० नोव्हेंबरला शंभर टक्के मतदान करण्याचे आवाहन केले. मतदार जनजागृती फेरीत केंद्रीय संचार ब्यूरो,पुणे ( महाराष्ट्र व गोवा ) आणि भारत निवडणूक आयोग यांचा मतदार जागृती चलचित्र रथ, एस. जी. विद्यालय, डॉ.सी.एम.मेहता विद्यालय, विद्या प्रबोधिनी शाळा, न. पा. शिक्षण मंडळ शाळा क्र. ६, एम.के.आढाव विद्यालय, मौलाना मुनीर उर्दू हायस्कूल, एस. एस. जी. एम. काॅलेज चे विद्यार्थी- विद्यार्थीनी, शिक्षक तसेच कोपरगांव नगरपालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षकांनी कोपरगाव शहरातील गावठाण भागात स्वतंत्र जनजागृती फेरी काढून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.