कोपरगांवात उत्तर नगर जिल्हा दिव्यांगांचा मेळावा संपन्न
कोपरगांवात उत्तर नगर जिल्हा दिव्यांगांचा मेळावा संपन्न
भारतराष्ट्र सुखी ठेवण्यासाठी सक्षमांनी अग्रेसर व्हावे- रमेश सावंत
कोपरगाव विजय कापसे दि १६ डिसेंबर २०२४– राष्ट्र आणि परमार्थ हे ईश्वराचे रुप आहे. राष्ट्र कार्य हे परमार्थ कार्य असून भारतराष्ट्र सुखी ठेवण्यासाठी सक्षमांनी अग्रेसर व्हावे. असे आवाहन ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश सावंत यांनी केले. समदृष्टी क्षमता विकास एवं अनुसंधान मंडळ (सक्षम) अंतर्गत उत्तर नगर जिल्हा अधिवेशन संत सेना नाभिक समाज मंगल कार्यालय कोपरगांव येथे रविवारी आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमास जेष्ठ स्वयंसेवक रमेश सावंत, ऋतुजा फाउंडेशनच्या डॉ. अंजली केवळ, आंतरराष्ट्रीय लेखक सुरेश कोल्हे, सक्षमचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष श्रीकांत साळुंके, सचिव भास्करराव जाधव, सहसचिव सचिन क्षीरसागर, सतिष निकम, महिला प्रमुख स्नेहाताई कुलकर्णी, आनंद वाघ, सचिन पोटे, समन्वयक गोकुळ पावडे,पुरुषोत्तम वायकुळ, मुकुंद मामा काळे, ह. भ. प. दवने महाराज, ह.भ.प.नानासाहेब शिंदे महाराज,बाळासाहेब शिंदे उपस्थित होते. स्नेहांकितचे श्रीकांत बागुल अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी होते. या प्रसंगी प्रमुख वक्ते रमेश सावंत पुढे म्हणाले, माणसामध्ये संवेदनशीलता असायला हवी. जो तन्मयतेने समाजाशी समरस होतो तेव्हा त्याला तेथील दु:ख कळते.संस्कार करणारा चांगला कार्यकर्ता होवू शकतो. असे सांगत मोठे पणासाठी काम करु नका.असा सल्ला दिला.
या प्रसंगी प्रमुख वक्त्या ऋतुजा फाऊंडेशनच्या संस्थापिका डॉ. अंजली केवळ म्हणाल्या, दिव्यांगांचे २१ प्रकार असून त्याची ७ प्रकोष्ठात विभागणी केली आहे. थॅलेसेमिया हा अनुवांशिक आजार आहे.त्याचे समुळ उच्चटन करायचे आहे. सक्षमाच्या सोबतीने भारतमातेला सुदृढ करायचे आहे.असे सांगितले आंतरराष्ट्रीय लेखक सुरेश कोल्हे म्हणाले, आपणच आपल्याला जपायला हवे. आपण या निर्दयी जगात जगतो आहोत हेच आपले सामर्थ्य असल्याचे सांगत शेरोशायरी करुन श्री साईबाबा यांचे जीवनावर कविता सादर केली.
अधिवेशनाचे अध्यक्ष स्नेहांकितचे श्रीकांत बागुल म्हणाले, आजार होणार नाही असा समाज निर्माण करण्याची गरज आहे. शारीरिक दृष्ट्या सक्षम माणसांनी हिरहीरीने सहभाग घेवून दिव्यांगांना सक्षम करण्याचे आवाहन केले. कालांश उद्योजिका रेणुका काले, तहसिलचे वरिष्ठ लिपिक राजेंद्र चौरे,आय.डी.बी.आय.बॅंकेचे सहाय्यक व्यवस्थापक अजय तांबे या दिव्यांगांचा विशेष सत्कार करण्यात आला. अधिवेशनाचा प्रारंभ भारतमाता आणि लुई ब्रेल यांचे प्रतिमापुजनाने झाला. सचिन क्षीरसागर यांनी सक्षम गीत सादर केले. उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक भास्करराव जाधव तर सुत्रसंचालन श्रीकांत साळुंके यांनी केले. शांती मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.अधिवेशनास उत्तर नगर जिल्ह्यातील दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.